

दर्पण न्यूज भिलवडी :-
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला … ज्ञानोबा माऊली तुकाराम..विठ्ठल नामाच्या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या गजरात चिमुकल्या वारकऱ्यांनी विठ्ठल नामाची शाळा भिलवडी नगरीत बहरली. सकाळी सकाळी भिलवडी नगरीत काही काळ पंढरपूर अवतरल्याचा भास झाला.
आषाढी एकादशी निमित्त भिलवडी शिक्षण संस्थेच्या डॉ.प्रकाश गोसावी बालवाडी व खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी यांनी आयोजित केलेल्या बालवारकऱ्यांच्या दिंडीत भिलवडी व परिसरातील गावातील विद्यार्थी,शिक्षक,पालक,ग्रामस्थ आणि संस्थेचे पदाधिकारी सहभागी झाले. प्रारंभी सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतीक पाटील यांच्या शुभहस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या हस्ते हनुमान मंदिरात पांडुरंगाची आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. भिलवडी ग्रामपंचायत समोरील व्यासपीठावर विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्ती वर आधारित विविध नृत्य व नाट्यप्रकाराची सादरीकरण केले. यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त अशोक चौगुले, संचालक महावीर वठारे, संभाजी सूर्यवंशी,चंद्रकांत पाटील,धनंजय पाटील,पलूस तालुका पंचायत समिती सदस्या हजराबी सलामत,
सरपंच स्वप्नाली रांजणे, माजी सरपंच शहाजी गुरव, माजी उपसरपंच बाळासाहेब मोरे,भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके, बालवाडी व प्राथमिक विभागप्रमुख प्रा.मनीषा पाटील,वारकरी पारायण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र सावंत,उत्तर भाग विकास सोसायटीचे चेअरमन रमेश पाटील,महावीर नगरी पतसंस्थेचे चेअरमन चया जमादार, धनंजय साळुंखे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी स्वागत केले. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सुचेता कुलकर्णी यांनी आभार मानले.
यावेळी बोलताना बाळासाहेब मोरे म्हणाले की,भिलवडी शिक्षण संस्थेच्या बालवाडी व प्राथमिक विभागाने आषाढी वारीच्या निमित्ताने आपली वारकरी परंपरा व संस्कृती जोपासली आहे. हा उपक्रम कौतुकास्पद असा आहे.
भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच भिलवडी शिक्षण संस्था विविध उपक्रम राबवित आहे.त्यास भिलवडीकर भरभरून प्रतिसाद देत आहेत. बालवाडी व प्राथमिक विभागातील मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी पालकांचे या सोहळ्यानिमित्त त्यांनी खास कौतुक व अभिनंदन केले.
भिलवडी ग्रामपंचायत,मेन रोड,बाहेरील गल्ली,स्वामी समर्थमहाराज मठ, महादेव मंदिर,पाटील गल्ली, राम मंदिर ते हनुमान मंदिर या मार्गाने दिंडी काढण्यात आली. माऊलींचे अश्व, सजवलेली पालखी, विठ्ठल रुक्मिणीसह विविध संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. चौकाचौकात महिला व ग्रामस्थांनी या बालवारकऱ्यांच्या दिंडीवर पुष्पवृष्टी केली. पालखीचे पंचारतीने ओवाळून स्वागत केले. हनुमान मंदिराभोवती माऊलींच्या आश्वासह, भगव्या पताकाधारी बालवारकऱ्यांनी रिंगण सोहळा धरला. त्यास उपस्थितांनी उस्फुर्त अशी दाद दिली. ग्रामपंचायत भिलवडी व नागरिकांच्या वतीने उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
