– राज्यस्तरीय ३०० कोटी वृक्षारोपण अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
– जिल्हाभरात १५ लाख रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट
दर्पण न्यूज सांगली- : जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या १५ लाख वृक्ष लागवड अभियानात जास्तीत जास्त निसर्गप्रेमींनी सहभाग नोंदवावा. केलेल्या वृक्षलागवडीची माहिती अमृतवृक्ष ॲप व haritsangli.in या संकेतस्थळावर अद्ययावत करावी. हे अभियान यशस्वी करून हरित सांगलीसाठी आपले बहुमूल्य योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज केले.
सांगली परिक्षेत्रातील मिरज रेल्वे वसाहत येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते वृक्षारोपण करून १५ लाख वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपवनसंरक्षक सागर गवते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे आदि उपस्थित होते. यावेळी लागवड केलेल्या रोपांचे जतन व संवर्धन करण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘३०० कोटी वृक्षारोपण अभियान (सन २०२६–२०४७)’ अंतर्गत आषाढी एकादशीचे औचित्य साधून आज सांगली जिल्ह्यात १५ लाख वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रीय वन धोरणानुसार देशातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किमान ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित व वृक्षच्छादित असणे अपेक्षित असून, महाराष्ट्रात सध्या हे प्रमाण २१.२५ टक्के आहे. २०४७ पर्यंत वनाच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने ‘३०० कोटी वृक्षारोपण अभियान’ हाती घेतले असून, त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी “हरित महाराष्ट्र आयोग” स्थापन करण्यात आला आहे. वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभाग, महसूल विभाग, कृषी / फलोत्पादन विभाग, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका, नगरविकास विभाग, उद्योग विभाग, जलसंपदा विभाग, मृद व जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, सहकार विभाग, वस्त्रोद्योग विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी प्रसाधन विभाग व इतर यंत्रणांच्या समन्वयातून हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते रोपवन स्थळ माहितीफलकाचे अनावरण करून औपचारिकरित्या 300 कोटी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर सर्व मान्यवरांनी वृक्षारोपण केले. यावेळी सहायक वनसंरक्षक मयूर शेळके, वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर व कौशल्या भोसले, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी सामाजिक वनीकरण विभागातील क्षेत्रीय व कार्यालयीन कर्मचारी, श्री छत्रपती शिवाजी अकॅडमी, मालगाव व महानगरपालिका शाळा क्र. 13 चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
