

दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार)—:
महाराष्ट्र शासनाच्या ३०० कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत सांगली जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या “हरित सांगली हरित महाराष्ट्र अभियान” अंतर्गत विटा नगरपरिषदेकडून शहरात व्यापक वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली आहे. पर्यावरण संतुलन राखणे, वाढते प्रदूषण कमी करणे आणि भावी पिढ्यांसाठी हिरवेगार वातावरण निर्माण करणे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानाला विटा शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विटा येथील १०० फुटी रोड जवळ मियावाकी गार्डनमध्ये आयोजित करण्यात आलेला वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विटा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, सर्व सन्माननीय नगरसेवक आणि मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शहर अधिक हिरवेगार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. वाढत्या शहरीकरणामुळे झपाट्याने कमी होत चाललेली हरितक्षेत्रे लक्षात घेता, नगरपरिषदेकडून नियोजनबद्ध वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणारी व पर्यावरणपूरक अशी वड, पिंपळ, चिंच, लिंब, करंज आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे मियावाकी पद्धतीचा अवलंब करून कमी जागेत दाट व जलद वाढणारे जंगल तयार करण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न असून, या उपक्रमामुळे भविष्यात शहरातील प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
यावेळी नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे म्हणाल्या की “पर्यावरणाचा समतोल राखणे ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज आहे. झपाट्याने वाढणारे प्रदूषण, तापमानवाढ आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरील ताण यामुळे भविष्यात गंभीर परिणाम संभवतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने ‘एक व्यक्ती – एक झाड’ हा संकल्प करून वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घ्यावा. केवळ झाडे लावणे नव्हे तर त्यांचे संगोपन करणे हीदेखील आपली जबाबदारी आहे. विटा शहर हरित, स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असून नागरिकांच्या सहकार्याने आपण हे ध्येय निश्चितच साध्य करू,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, नगरसेविका प्रितिताई पवार, संजय भिंगारदेवे, रामचंद्र भिंगारदेवे,कन्हैया पवार, वाघमोडे साहेब, संदीप वाघमारे, संतोष लोखंडे, नितीन चंदनशिवे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी प्रत्यक्ष वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
विटा नगरपरिषदेच्या या उपक्रमामुळे शहराच्या हरित विकासाला निश्चितच चालना मिळणार असून, भविष्यात अशा आणखी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही यावेळी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी सांगितले
