दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) : विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्थेची प्रत्यक्ष ओळख व्हावी, मतदानाचे महत्त्व समजावे तसेच निवडणूक प्रक्रियेचा अनुभव मिळावा या उद्देशाने भारतमाता ज्ञानपीठ संचलित सौ. विजयमाला पतंगराव कदम प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, विटा येथे विद्यार्थी प्रतिनिधी पदाच्या निवडणुका उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांनीच पार पाडल्याने हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरला.
निवडणुकीपूर्वी उमेदवारांनी प्रचारसभा घेतल्या, मतदारांशी संवाद साधला तसेच आचारसंहितेचे पालन करत आपापले निवडणूक जाहीरनामे विद्यार्थ्यांसमोर मांडले. मतदानाच्या दिवशी गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. मतमोजणीनंतर श्रीजल संतोष पाटणकर यांनी वरद गणेश मुरमुरे व आदित्य विकास बिसूरकर यांचा पराभव करून विजय मिळविला. तर श्रेया सचिन महाडिक यांनी तन्वी गणेश भिंगारदेवे आणि अनुश्री विक्रम बेरगळ यांचा पराभव करून विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विजय संपादन केला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना उमेदवारांची जबाबदारी, मतदारांचे अधिकार, मतदान प्रक्रिया, मतमोजणी, लोकशाही मूल्ये, निवडणूक आचारसंहिता तसेच प्रामाणिक व पारदर्शक निवडणुकीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले.
निवडणूक अधिकारी म्हणून विद्यार्थिनी दूर्वा लाटणे, प्रणाली बाबर, राजनंदनी क्षीरसागर, आर्या यमगर, आराध्या कलढोणे, विशाखा कदम तसेच विद्यार्थी आसद मुल्ला, ईशान लिपारे, मोक्ष सूर्यवंशी, आदित्य केंगार, समीर मुजावर आणि राजदीप खरजे यांनी उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडली.
विजयी उमेदवारांचा संस्थेचे संस्थापक साहित्यिक रघुराज मेटकरी, संस्थेच्या अध्यक्षा रेखा शेंडगे, प्राचार्या वैशाली कोळेकर कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व अभिनंदनपत्र देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत लोकशाही व्यवस्थेचे मूल्य जपण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी राजू गारोळे, तात्यासो शेंडगे, सागर कचरे, अभिजीत निरगुडे स्वप्नाली पवार, स्वप्नाली भिंगारदेवे, पूर्वा पाटील, अमित अबदर, असीफ मुजावर, हर्षवर्धन मेटकरी, शुभम वरुडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेने राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि उपस्थितांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जपणूक, नेतृत्वगुणांचा विकास आणि जबाबदार नागरिक घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
