दर्पण न्यूज सांगली : महावितरण (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) मार्फत राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित सक्तीविरोधात सांगलीत जनआक्रोश उसळला असून, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली.
विश्रामबाग येथील मंडल कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत “स्मार्ट मीटर हटवा – ग्राहक वाचवा!”, “अवाजवी वीज बिल बंद करा!” अशा जोरदार घोषणा देत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
⚡ ४८ तासांच्या नोटीसने नागरिकांवर दबाव?
आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, महावितरणकडून नागरिकांना ४८ तासांच्या आत स्मार्ट मीटर बसविण्याचे संदेश पाठवून मानसिक दबाव निर्माण केला जात आहे. ही प्रक्रिया ऐच्छिक असल्याचे शासनाने स्पष्ट केले असतानाही, प्रत्यक्षात सक्तीचा अवलंब केला जात असल्याचा आरोप करण्यात आला.
कायद्याचे उल्लंघन — BNS व ग्राहक कायद्यांतर्गत कारवाईची मागणी
संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, हा प्रकार :
भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फसवणूक व दबाव टाकण्याचा गुन्हा
ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत अन्यायकारक व्यापार पद्धती
या गंभीर कायदेशीर उल्लंघनांत मोडतो.
अधिकाऱ्यांना थेट इशारा — “सक्ती थांबवा, अन्यथा कायदेशीर लढा”
यावेळी मागण्यांचे निवेदन मंडल कार्यालय, विश्रामबाग येथील अधिक्षक अभियंता Amit Bokil यांना देण्याफत आले.
संघटनेने स्पष्ट इशारा देत सांगितले की :
* स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ थांबवावी
* ग्राहकांचा निवडीचा हक्क अबाधित ठेवावा
अन्यथा, राज्यभर कायदेशीर कारवाई व तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.
मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती
या आंदोलनात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी — प्रशांत वाघमारे, संजय भूपाल कांबळे, संजय संपत कांबळे, जगदिश कांबळे, अनिल मोरे (सर), हिरामण भगत, किशोर आढाव, युवराज कांबळे, जिल्हा सदस्य अशोक लोंढे, सांमिकु शहर महापालिका क्षेत्र अध्यक्ष मोहन साबळे, सांगली शहर अध्यक्ष विनायक मोरे, सम्यक विद्यार्थी आंदोलन सांगली जिल्हाध्यक्ष शिवाजी उर्फ पवन वाघमारे, संगाप्पा शिंदे, किरण मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच, वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल या विविध संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जनतेचा संतप्त सवाल :
“स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट? ग्राहकांचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न का?”
सदर आंदोलनामुळे सांगलीत खळबळ उडाली असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.