दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :-
विटा नगरपरिषदेच्या पाणी शुद्धीकरण केंद्रातील CFL यंत्रणेत तांत्रिक बिघाड निर्माण होऊन सदर यंत्रणा बंद पडल्यामुळे शहरातील काही भागांमध्ये काही कालावधीसाठी गढूळ पाणीपुरवठा झाल्याचे निदर्शनास आले होते.
सदर बाबीची दी.१०/७/२०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष काजल काकी म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल दादा बाबर आणि पाणीपुरवठा सभापती सुरेश पवार यांनी गंभीर दखल घेत तातडीने CFL यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दूर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विटा पालिकेची पाणीपुरवठा विभागाची टीम दोन दिवस कार्यरत होती. आवश्यक दुरुस्ती पूर्ण करण्यात आली असून, CFL यंत्रणा आता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी शुद्धीकरण प्रक्रिया सुरळीत झाली असून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत व नियमित होत आहे.
दरम्यान, CFL यंत्रणा बंद असल्याची बाब वेळेत वरिष्ठांच्या निदर्शनास न आणणे तसेच पाणी शुद्धीकरण प्रक्रियेवर आवश्यक देखरेख व नियंत्रण ठेवण्यात झालेल्या त्रुटीची नगरपरिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित पाणीपुरवठा अभियंतास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, प्राप्त खुलाशाच्या अनुषंगाने नियमानुसार पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे. याआधी सुद्धा पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या सुरेश भोसले यांच्या विरुद्ध प्रशासकीय कारवाई करत त्यांना सेवेतून पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान खानापूर मतदार संघाचे आमदार सुहास भय्या बाबर यांनी सोमवारी पालिकेत येऊन
पाणीपुरवठा विभागास पाणी शुद्धीकरण केंद्रातील सर्व यंत्रणांची नियमित तपासणी व देखभाल करणे तसेच पाण्याच्या गुणवत्तेवर सातत्याने देखरेख ठेवण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.
नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे विटा नगरपरिषदेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
मुख्याधिकारी
विटा नगरपरिषद, विटा