दर्पण न्यूज पलूस भिलवडी-: सामाजिक बांधिलकी, सभासदाभिमुख सेवा, पारदर्शक कारभार आणि आर्थिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘सकाळ गौरवगाथा २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने अंकलेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्या., अंकलखोप या संस्थेचा सन्मान करण्यात आला.
हा मानाचा पुरस्कार संस्थेच्या वतीने संस्थापक चेअरमन मा. श्री. राजेश चौगुले यांनी स्वीकारला. यावेळी व्हा. चेअरमन रघुनाथ गडदे संस्थेच्या संचालक मंडळातील सदस्य राजेंद्र कुंभार सर, विकास सूर्यवंशी, जनरल मॅनेजर आर. एस. पाटील उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना संपूर्ण संचालक मंडळाने संस्थेच्या यशाचा अभिमान व्यक्त केला.
अंकलेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने अल्पावधीतच सभासदांचा विश्वास संपादन करत बचत, ठेव योजना, कर्जपुरवठा तसेच विविध आर्थिक सेवांद्वारे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या आर्थिक प्रगतीसाठी सातत्याने कार्य केले आहे. संस्थेची प्रामाणिक सेवा, पारदर्शक व्यवस्थापन आणि समाजाभिमुख उपक्रम यांची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी संस्थापक चेअरमन मा. श्री. राजेश चौगुले यांनी हा पुरस्कार संस्थेच्या सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक, अधिकारी, कर्मचारी आणि संचालक मंडळाच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगितले. भविष्यातही अधिक गुणवत्तापूर्ण सेवा देत संस्थेची विश्वासार्ह परंपरा कायम राखण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या गौरवपूर्ण यशाबद्दल संस्थेचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, हा पुरस्कार अंकलेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीसाठी आणखी प्रेरणादायी ठरणार आहे. संस्थेच्या उज्ज्वल वाटचालीत हा सन्मान निश्चितच एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.