दर्पण न्यूज (धाराशिव प्रतिनिधी संतोष खुणे) -: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उपसंचालक आरोग्य सेवा,परिमंडळ लातूर रेखा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली १ जुलै रोजी जिल्हास्तरीय आरोग्य आढावा बैठक उत्साहात पार पडली.बैठकीत आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या पूर्वतयारीचा आढावा घेत नागरिकांना दर्जेदार,तत्पर आणि सुरक्षित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, जिल्हास्तरीय अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,कार्यक्रम समन्वयक तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे जिल्हास्तरीय कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
आगामी श्री आषाढी वारी पंढरपूर पालखी सोहळा लक्षात घेऊन यात्रेदरम्यान आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारीबाबत चर्चा झाली. औषधसाठा,वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व्यवस्था,स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तसेच संसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
याशिवाय संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम,सार्वत्रिक लसीकरण,माता व बाल आरोग्य सेवा,कुटुंब कल्याण कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध योजनांची प्रगती,सेवा गुणवत्तावाढ तसेच शासनाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाचाही विशेष आढावा घेण्यात आला.हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त ग्रामपंचायतींना पुरस्कारासाठी पात्र ठरविण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. लोकसहभागातून ही चळवळ अधिक व्यापक करण्यावर भर देत नागरिकांमध्ये आरोग्यदायी सवयी विकसित व्हाव्यात,आजार होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपायांची सवय लागावी आणि जनजागृती प्रभावीपणे व्हावी,असे निर्देश देण्यात आले.