– एकल महिला धोरण निश्चितीसाठी अभिप्राय कार्यशाळा उत्साहात
– सर्वसमावेशक धोरणाच्या अनुषंगाने तज्ज्ञ, मान्यवर, एकल महिलांचे विचारमंथन
दर्पण मिरज /सांगली : एकल महिलांनी एकटे न राहता संघटित शक्ती निर्माण करावी. त्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे स्थान निर्माण करावे, या अनुषंगाने राज्य शासनाचे एकल महिला धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख व वास्तवाधिष्ठीत करण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेली कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी आज येथे केले.
सांगली जिल्हास्तरीय एकल महिला अभिप्राय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव गि. ग. कांबळे, तहसीलदार शुभांगी कनवाडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, प्राचार्य पूजा नरवाडकर, ॲड. सुनिता पाटील आदि उपस्थित होते.
राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कायदेशीर, आरोग्यविषयक व पुनर्वसनासंदर्भातील प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याच्या अनुषंगाने ही सांगली जिल्हास्तरीय अभिप्राय कार्यशाळा घेण्यात आली.
प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर म्हणाल्या, एकल महिलांनी स्वयंसहाय्यता गटांमध्ये सहभागी होऊन सर्वांच्या मदतीने स्वतःची उन्नती साधावी. ग्रामीण महिलांनी गृहउद्योग निषिद्ध न मानता शहरांची गरज ओळखून वस्तुंचा पुरवठा केल्यास ते फायदेशीर ठरत आहे. महिलांसाठी असणाऱ्या राज्य शासनाच्या अनेक योजनांची माहिती घेऊन महिलांनी स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडवावेत. एकल महिलांना सन्मानाने, सुरक्षिततेने आणि स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव गि. ग. कांबळे म्हणाले, महिलांनी एकल न राहता स्वावलंबी व्हावे. त्याचबरोबर रोजगार निर्मिती करावी. त्या माध्यमांतून इतरांनाही काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. कायदेविषयक सल्ला व मदतीची गरज भासल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणशी संपर्क साधावा. महिलांविषयी असणाऱ्या योजना व टोल फ्री क्रमांकाची माहिती करून घ्यावी, असे सांगून त्यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.
तहसीलदार शुभांगी कनवाडे यांनी महिलांसाठी असणाऱ्या सामाजिक सहाय्यता योजनांची माहिती देऊन याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्य पूजा नरवाडकर यांनी एकल महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार असल्याचे सांगून मौलिक मार्गदर्शन केले. ॲड सुनिता पाटील, प्रेमला साळी, लतादेवी बोराडे यांच्यासह यशस्वी महिलांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी एकल महिलांचा सत्कार करण्यात आला.
राज्य शासनाचे प्रस्तावित एकल महिला धोरण अधिक प्रभावी, सर्वसमावेशक आणि तळागाळातील महिलांच्या गरजांशी सुसंगत करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेत एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, कायदेशीर, सुरक्षितता, रोजगार, निवारा व सन्मानपूर्वक जीवनाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था, विविध क्षेत्रांतील महिलांनी मांडलेल्या सूचना व अभिप्रायांचा राज्याच्या धोरण निर्मितीत विचार केला जाणार आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले.
प्रास्ताविकात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. एकल महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी धोरण तयार करण्यात या कार्यशाळेतील सूचना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर कारणांमुळे एकट्याने जीवन जगणाऱ्या महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या सक्षमीकरणासाठी व्यापक धोरणाची आवश्यकता लक्षात घेऊन राज्य शासनाने प्रत्येक जिल्हा स्तरावर अशा कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा परिविक्षा अधिकारी एस. एच. बेंद्रे यांनी आभार मानले. उपस्थितांसाठीही विविध शासकीय योजनांचा समाहिती कक्षही उपलब्ध करून देण्यात आला होता.
कार्यशाळेदरम्यान उपस्थितांकडून लेखी स्वरूपात अभिप्राय व सूचना नोंदविण्यात आल्या. या सूचना राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असून राज्याच्या एकल महिला धोरण तयार करताना त्यांचा विचार केला जाणार आहे.
कार्यक्रमास विविध शासकीय विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, महिला बचत गटांच्या सदस्या, समाजसेविका, एकल महिला तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.