दर्पण न्यूज कोल्हापूर -:अनिल पाटील
केंद्र सरकारच्या साखर उद्योगासंदर्भातील धोरणांमुळे राज्यातील साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचा दावा करत पदवीधर मित्र संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष माणिक पाटील (चुयेकर) यांनी कोल्हापुरातून ‘शेतकरी व साखर कारखानदार बचाव आंदोलन’ उभारण्याची घोषणा केली आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना, साखर कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक तसेच संबंधित घटकांशी चर्चा सुरू करण्यात आली असून, या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
एफआरपीमध्ये ४,५०० रुपये आणि एमएसपीमध्ये २० रुपये वाढ यांसह साखर उद्योगाशी संबंधित विविध मागण्या शासनाकडे मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचाही दावा त्यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे.
कोल्हापुरात लवकरच या बचाव आंदोलनाचे पहिले अधिवेशन आयोजित करण्यात येणार असून, राज्यभरातील शेतकरी आणि साखर उद्योगाशी संबंधित घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे माणिक पाटील (चुयेकर) यांनी स्पष्ट केले.