दर्पण न्यूज मिरज/सांगली : सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात उन्हाळ्याची सुट्टी संपून दि. 15 जून, 2026 रोजी शाळा सुरू होत आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यातील 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्वच मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी 15 ते 30 जून, 2026 या कालावधीत जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम राबवण्यात येत असून, त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन सुरू केले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना (दिव्यांग मुलांसह) शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती यांनाही शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांच्या बरोबर या उपक्रमांत सक्रिय सहभाग घेण्याची विनंती करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या सर्व नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती विविध प्रसार माध्यमांच्या सहाय्याने सर्वत्र प्रसारीत करण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ उत्साह, चैतन्य व आनंदमयी होईल अशा पध्दतीने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सर्व तालुक्यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
पटनोंदणी पंधरवड्यात दाखलपात्र मुलांची यादी तयार करुन शाळा फलकावर, ग्रामपंचायत येथे दर्शनी भागात तसेच गावातील प्रमुख चौकातील फलकावर लावून त्यांना शाळेत दाखल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेष गरजा असणाऱ्या प्रत्येक बालकास शाळेत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. शाळा प्रारंभ दिनापुर्वी शाळा व्यवस्थापन समिती बैठक आयोजित करण्यात येणार असून, स्थानिक लोकप्रतिनिधी, क्षेत्रिय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक दाखलपात्र मुलांच्या गृहभेटी देणार आहेत.
शाळा प्रवेशोत्सवामध्ये सर्वस्तरीय अधिकारी, सर्व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक गट, अंगणवाडी ताई/सेविका, आशा वर्कर यांचे बरोबर स्थानिक शैक्षणिक व सामाजिक संस्था, सहकारी संस्था, स्थानिक सेवाभावी संस्था (युवक मंडळे, मित्र मंडळे, क्रीडा मंडळे, बचत गट, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ), पालक व ग्रामस्थ यांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर स्थानिक पातळीवरती शिक्षकांमार्फत गृहभेटी देण्यात येणार आहेत. तसेच, शाळा सुरु होण्यापूर्वी गावा-गावात दवंडी देण्यात येणार आहे. शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षक हे शालेय परिसर स्वच्छता, सडा रांगोळी इ. कार्यवाही करतील. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व परिसराची सजावट करून नवागतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून सवाद्य मिरवणुकीने शाळेत (सुरक्षित) आणण्यात येईल. सवाद्य प्रभात फेरी, बैलगाडी, घोडागाडी, रथ व प्रवेश दिंडी यांचेही आयोजन करण्यात येणार आहे. शाळा प्रारंभ दिनी नवागतांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प/रोपे /खाऊ व पाठ्यपुस्तके देऊन केले जाणार आहे. तसेच, शाळेच्या प्रथम दिवशी मध्यान्ह भोजनात गोड पदार्थांचा समावेश करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सर्व तालुक्यांकडून दररोज शाळेत दाखल होणाऱ्या मुलांची माहिती जिल्हास्तरावर संकलित केली जाणार आहे. 100 टक्के पटनोंदणी करणेच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
०००००