राज्यात आणि जिल्ह्यात सध्या उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) प्रभाव जाणवत आहे. वाढत्या पाऱ्यामुळे उष्माघात (Heat Stroke) होण्याची शक्यता असते. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खालीलप्रमाणे ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि वाढत्या तापमानामुळे आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या कडक उन्हात स्वतःची आणि कुटुंबाची काळजी कशी घ्यावी, याबाबतचा हा सविस्तर लेख…
राज्यासह जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघात (Heat Stroke) व इतर उष्णताजन्य आजारांचा धोका वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, काळजी घेतल्यास गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात, असे आवाहन करण्यात आले आहे.
उन्हाळ्यातील तीव्र तापमानाचा थेट परिणाम शरीरावर होत असल्याने विशेषतः लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला, तसेच मैदानी काम करणारे कामगार यांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.
उष्माघाताची लक्षणे
चक्कर येणे, उलटी व मळमळ होणे, शरीराचे तापमान खूप वाढणे, पोटात कळा येणे, शरीरातील पाणी कमी होणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे?
तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावीत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा. प्रवास करताना पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या कामगारांनी / व्यक्तिंनी डोक्यावर टोपी किंवा पांढरा रूमाल बांधावा किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस. घ्यावे. घरी तयार करण्यात आलेली लस्सी / ताक / कैरीचे पन्हे / लिंबू पाणी इत्यादिंचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना / पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.
पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी कामगारांसाठी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर उन्हात काम करीत असताना थोड्या थोड्या अंतराने विश्रांती घ्यावी. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत, जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी. काँक्रीट घराच्या छतावर पांढरा रंग द्यावा. टीन पञ्याच्या छतावर गवताची पेंढी / धान्याचा कडबा यांचे आच्छादन करावे. छतावरील पाणी साठवण्याच्या प्लास्टिक टाक्या गोणपाटाच्या सहाय्याने झाकाव्यात.
काय करू नये?
लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत बाहेर कामे करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये. मद्य सेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक घेवू नये. त्यामुळे डीहायड्रेशन होते. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये. उष्माघाताची लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधावा. ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर राहावे.
अतिरिक्त खबरदारी
मोबाईलवर हवामानाचा अंदाज नियमित तपासावा. हीट अलर्ट असल्यास घराबाहेर जाणे टाळावे. शाळा/कामाच्या वेळांमध्ये आवश्यक ते बदल करावेत. सार्वजनिक ठिकाणी पाणपोई व सावलीची सोय वाढवावी. छतावर पांढरा रंग दिल्यास घरातील तापमान कमी राहते
सावध राहा, सुरक्षित राहा
उष्णतेची लाट ही नैसर्गिक असली तरी योग्य काळजी घेतल्यास तिचे दुष्परिणाम टाळता येतात. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवावे. उष्णतेची ही लाट निसर्गदत्त असली तरी, खबरदारी घेतल्यास आपण उष्माघाताला नक्कीच रोखू शकतो.
संकलन – श्रीमती संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली