दर्पण न्यूज मिरज / सांगली : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत देशातील १८ ते २५ वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे. कोणत्याही ठिकाणी नोकरी करत नसलेल्या युवकांसाठी ही योजना आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या इंटर्नशिपचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
ही योजना सुरु करण्यामागचा उद्देश बेरोजगार तरुणांना रोजगाराची योग्य संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना रोजगारक्षम करण्यासाठी अग्रगण्य कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळेल. या अंतर्गत युवकांना ६ ते ९ महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल. या सोबतच त्यांना दरमहा 9 हजार रुपये विद्यावेतन मिळेल. या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलै २०२४ च्या अर्थ संकल्पात केली होती. दहावी, बारावी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर अशा उमेदवारांनी इंटर्नशिप संधीसाठी http://pminternship.mca.gov.in पोर्टलवर नोंदणी करावी. या योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in पोर्टलवर प्रोफाईल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जास्तीत जास्त तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात.
या योजनेअंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाते. या व्यतिरिक्त कंपनी इंटर्नला अतिरिक्त अपघात विमा संरक्षण देखील प्रदान करते.
सांगली जिल्ह्यातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. या कंपनी मध्ये सेल्स आणि मार्केटिंग या क्षेत्रात इंटर्नशिप करण्यासाठी 5 जागा उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली येथे संपर्क करावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.