
दर्पण न्यूज पलूस:- दिव्यांग बांधव हे समाजाचे अविभाज्य घटक आहेत. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत विनासायास आणि जलद गतीने पोहोचणे आवश्यक आहे. याच सामाजिक जाणिवेतून, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप (आप्पा) कदम यांच्या शुभहस्ते पलूस पंचायत समितीच्या दिव्यांग विभागाला लॅपटॉप, संगणक आणि प्रिंटर संच नुकताच प्रदान करण्यात आला. शनिवार, दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) श्री. राजेश कदम साहेब कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या दिव्यांग विभागाचे कामकाज श्री. विनोद अल्हाट (दिव्यांग सहाय्यक) हे अत्यंत तत्परतेने पाहत आहेत. गावोगावी कॅम्प आयोजित करणे, दिव्यांगांना योजनांची माहिती देणे आणि जागेवरच त्यांची कामे मार्गी लावणे यासाठी त्यांना लॅपटॉपची नितांत गरज होती. ही बाब सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार निकम यांनी प्रदीप आप्पांच्या निदर्शनास आणून दिली. आप्पांनी क्षणाचाही विलंब न लावता ही मागणी मान्य करून हा संच उपलब्ध करून दिला. यावेळी बोलताना प्रदीप आप्पा म्हणाले की, ”दिव्यांग बांधवांना समाजात सन्मानाने वावरता यावे आणि शासनाच्या सेवा मिळवताना त्यांना कोणताही त्रास होऊ नये, हे आपले कर्तव्य आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या माध्यमातून या सेवा आता अधिक गतिमान होतील. भविष्यातही या कामात काही अडचणी आल्यास आपण त्या प्राधान्याने सोडवू.” अध्यक्षीय भाषणात गटविकास अधिकारी राजेश कदम साहेब म्हणाले, “प्रदीप आप्पांचे कार्य नेहमीच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारे असते. जिल्हा परिषद शाळा असो वा सामाजिक उपक्रम, आप्पांची मदत प्रशासनाला नेहमीच मिळते. या लॅपटॉपमुळे दिव्यांग बांधवांची नोंदणी व योजनांची अंमलबजावणी करणे आता सोपे होईल.” या सोहळ्याप्रसंगी नंदकुमार निकम, तुकाराम धायगुडे, अमीर पठाण, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे, संगीता मोरे, केंद्र प्रमुख संजय डोंगरे, अनिल पाटील, आशिष सूर्यवंशी, विकास कदम, भास्कर संकपाळ, महेश हजारे, कुलदीप वारे, अंकुश गस्ते, उल्हास पाटील, अभिजीत सावंत, तुषार सूर्यवंशी, हरीश वडार, बाळकृष्ण पवार, प्रताप पाटील, रणजीत शिंदे यांसह अनेक मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.