दर्पण न्यूज गोवा/फोंडा (प्रतिनिधी) :-
आपल्या आयुष्यात गुरूच्या मार्गदर्शनाची नेहमीच नितांत गरज असून, गुरु शिष्य जोडीला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. कारण या गुरु शिष्यामध्ये झालेल्या प्रश्नोत्तरातूनच आपल्या संस्कृतीला, धर्माला, आचरणाला आणि विचारांना आकार मिळाला आहे. अशावेळी ‘श्री गुरु गीता’ या महत्वाच्या पुस्तकाचा मराठी अनुवादित प्रकाशित होणे हि काळजी गरज होती, असे प्रतिपादन प. पू. श्री पद्माकर महाराज ट्रस्टचे शिष्यगुरु सुब्राय काका यांनी केले.
बाळकृष्ण वसंत कामत यांनी मूळ संस्कृतमधून मराठीमध्ये अनुवादित केलेल्या ‘श्री गुरु गीता’ या पुस्तकाचे लोकार्पण खांडेपार येथील प. पू. श्री पद्माकर महाराज मंदिराच्या परिसरात प. पू. सुब्राय काका यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर अनुवादक बाळकृष्ण वसंत कामत, पुस्तकाचे निर्मिती सहयोगी आणि प्रसिद्ध कवी-लेखक उदय म्हांबरो, तसेच पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि साहित्य अभ्यासक किशोर अर्जुन यांची उपस्थिती होती.
संस्कृत भाषेत कित्येक महत्वाचे ग्रंथ उपलब्ध आहेत. पण आज सगळ्यांनाच संस्कृत अवगत आहे असे नाही. बाळकृष्ण कामत यांनी शिव-पार्वती यांच्यामधील संवाद असलेल्या ‘श्री गुरु गीता’ हे संस्कृत पुस्तक अनुवादित करून प्रकाशित करणे हि उल्लेखनीय बाब असून, त्यामुळे भाविक वाचकांना या पुस्तकात विशद केलेले ज्ञान, शिव पार्वती यांच्यातील संवाद समजून घेण्याची उत्तम संधी मिळाली असल्याचेही सुब्राय काकांनी यावेळी नमूद केले.
यावेळी पुस्तकाच्या अनुषंगाने बोलताना किशोर अर्जुन यांनी एकूणच भारतीय विचारपरंपरेत ज्ञान हे कधीही आदेश किंवा उपदेशाप्रमाणे नाही तर प्रश्नोत्तरे – संवाद यांच्या माध्यमातूनच समाजापर्यंत पोहोचले असल्याचे सांगितले. ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’ या उक्तीनुसार संवाद हाच ज्ञानाचा पाया आहे, मात्र आजच्या काळात हा संवादच कुठेतरी हरवत चाललो आहोत. माहितीचा, उपदेशाचा, आदेशाचा आपल्यावर सतत भडीमार होत असून, दुसऱ्यांचे ऐकण्याची आणि समजून घेण्याची सवय हळूहळू कमी होत गेल्याचेही निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदवले.
अनुवादक बाळकृष्ण कामत यांनी यावेळी ‘श्री गुरु गीता’चे आपल्या आयुष्यातील महत्व तपशीलवार सांगितले. तर उदय म्हांबरो यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सदर पुस्तक निर्मितीचा अनुभव वाचकांसमोर मांडला.