दर्पण न्यूज पलूस/भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे महसूल विभागामार्फत राबविण्यात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरामध्ये ७/१२ व ८अ, उताऱ्यांबाबत मार्गदर्शन, जमीन नोंदीतील दुरुस्ती, फेरफार, प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. तसेच उत्पन्न, जात, रहिवासी (डोमासाईल), अल्पभूधारक व नॉन क्रिमिलिअर दाखल्यांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले. याशिवाय डिजिटल ७/१२, ई-मोजणी, गट नकाशे, भूमी अभिलेख उत्तारे, पीएम किसान योजना, फार्मर आयडी, ई-पिक पाहणी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
रेशन कार्डसंबंधित सेवा (नाव कमी करणे व वाढवणे), आधार नोंदणी व दुरुस्ती, संजय गांधी व
श्रावण बाळ योजना, आयुष्यमान भारत कार्ड, लाडकी बहीण योजना, वयोवृद्ध योजना, दवाखाना दाखले, प्रतिज्ञापत्र तसेच एक खिडकी’ अर्ज प्रणालीद्वारे विविध कामांचा एकाच ठिकाणी निपटारा करण्यात आला.
जमीन व्यवहार, अतिक्रमण तक्रारी व इतर महसूल विषयक प्रश्नांचेही तत्काळ निराकरण करण्यात आले. या शिबिरात भिलवडी मंडल विभागामध्ये एकूण १३९० प्रकरणांचा विक्रमी निपटारा करण्यात आला. अनेक
नागरिकांच्या तक्रारी जागेवरच सोडविण्यात आल्या, तर काही प्रकरणे पुढील कार्यवाहीसाठी नोंदविण्यात आली. शासकीय सेवा सुलभ, जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.
या कार्यक्रमास पलूस तहसीलदार दिप्ती रिठे-जाधव, नायब तहसीलदार आसमा मुजावर, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक पाटील, सुदीप गडदे, पंचायत समिती सदस्य
हजराबी सलामत, शोभाताई हजारे, सरपंच स्वप्नाली रांजणे-कुरणे, पुवठा अधिकारी मंजुळा आत्राम, मनीषा पवार, महसूल सहाय्यक अधिकारी पुष्पा नेरलेकर, सुप्रिया खांबे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता देवेंद्र पाटील (तासगाव), सहाय्यक अभियंता राहुल येवले (भिलवडी), मंडल अधिकारी आण्णासाहेब हांगे, ग्राम महसूल अधिकारी सोमेश्वर जायभाय, ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या शिबिराचा भिलवडी परिसरासह आसपासच्या गावातील महिला, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.