देश विदेशमहाराष्ट्रसामाजिक

धर्म, धैर्य, शौर्य आणि सहिष्णुतेचे प्रतीक – ‘हिंद-दी-चादर’

 

 

            राज्य शासनामार्फत तीन टप्प्यांत ‘हिंद-दी-चादर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गुरु तेग बहादुर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे योगदान महाराष्ट्र, देश तसेच परदेशात राहणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचविणे, सामाजिक ऐक्य बळकट करणे आणि नव्या पिढीपर्यंत गुरु तेग बहादुर यांचे विचार पोहोचविणे हा राज्य शासनाचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

            राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यभर ३५०व्या शहीदी समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा हेतू युवा पिढीच्या मनामनांत त्याग, शौर्य आणि धर्मस्वातंत्र्याच्या मूल्यांची ज्योत प्रज्वलित करणे हा आहे. ‘हिंद-दी-चादर’ म्हणून पूजनीय असलेल्या श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा आणि मानवतेच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले. त्यांचा शहिदी दिवस हा केवळ एका व्यक्तीच्या स्मृतीचा दिवस नसून, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या धैर्याचा, स्वातंत्र्याच्या जपणुकीचा आणि सर्वधर्मसमभावाच्या उदात्त विचारांचा संदेश देणारा दिवस आहे. त्यांचे बलिदान भारतीय इतिहासातील तेजस्वी अध्याय असून आजच्या पिढीसाठी प्रेरणा, आत्मबल आणि राष्ट्रनिष्ठेचे अमर प्रतीक आहे. या ३५०व्या स्मरणवर्षानिमित्त राज्य शासन त्यांच्या अद्वितीय योगदानाला कृतज्ञ अभिवादन करीत असून त्यांच्या आदर्शांचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचा संकल्प दृढ करीत आहे.

            या उपक्रमाच्या माध्यमातून शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासी तसेच भगत नामदेव संप्रदाय (वारकरी) अशा श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्याशी ऐतिहासिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक नाते असलेल्या समुदायांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ३५० वर्षांनंतर या ऐतिहासिक नात्याचे पुनरुज्जीवन आणि बळकटीकरण करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. कार्यक्रमाच्या संरचनेमध्ये आध्यात्मिक प्रवचने, कीर्तन, ऐतिहासिक प्रदर्शन, शैक्षणिक सादरीकरणे तसेच समुदाय संवाद यांचा समावेश आहे. गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे जीवन, कार्य, शिकवण आणि त्याग यांचे दर्शन विविध उपक्रमांद्वारे घडविण्यात येणार आहे. विशेषतः शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यावर भर देण्यात येत असून गुरुजींच्या शहिदीचे ऐतिहासिक महत्त्व तसेच संविधानिक मूल्ये—धर्मस्वातंत्र्य, समानता आणि न्याय—यांच्याशी असलेले त्यांचे नाते नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे.

‘हिंद-दी-चादर’ : एका अद्वितीय बलिदानाची सजीव स्मृती

‘हिंद-दी-चादर’ ही केवळ एक उपाधी नसून भारतीय इतिहासातील एका अद्वितीय बलिदानाची सजीव स्मृती आहे. शीख धर्माचे नववे गुरु, गुरु तेग बहादुर साहिबजी यांना ‘हिंद-दी-चादर’—म्हणजेच हिंदुस्थानचे संरक्षक कवच—म्हणून गौरविण्यात येते. ‘चादर’ या शब्दात संरक्षण, आधार आणि मायेची ऊब दडलेली असते. ज्या प्रकारे चादर शरीराचे रक्षण करते, त्याचप्रमाणे गुरु तेग बहादुर साहिबजींनी धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपले शीश अर्पण केले. त्यामुळे ही उपाधी त्यांच्या त्यागाचे प्रतीक असून भारतीय संस्कृतीला लाभलेले अभेद्य नैतिक कवच मानली जाते.

            सतराव्या शतकातील भारत धार्मिक आणि सामाजिक अस्थैर्याच्या काळातून जात होता. काही ऐतिहासिक नोंदींनुसार त्या काळात धार्मिक तणाव तीव्र झाले होते. काश्मिरी पंडितांनी आपल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी गुरु तेग बहादुर साहिबजींकडे धाव घेतल्याचा उल्लेख परंपरेत आढळतो. त्या वेळी गुरूंनी घेतलेली भूमिका ही केवळ एका समुदायासाठी नव्हती, तर मानवी प्रतिष्ठा आणि धर्मस्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी होती. अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याचा त्यांचा निर्णय भारतीय इतिहासातील धैर्यपूर्ण घटनांपैकी एक मानला जातो.

            दिल्लीतील चांदणी चौक येथे त्यांना शहीद करण्यात आले. त्यांच्या बलिदानाने भारतीय समाजाला नवचैतन्य दिले. धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नसून स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि माणुसकीचा श्वास आहे, हा संदेश त्यांच्या कृतीतून अधोरेखित झाला. दुसऱ्याच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेले त्यांचे बलिदान अद्वितीय मानले जाते. म्हणूनच हा प्रसंग ‘चढदी कला’—अखंड सकारात्मकतेचा आणि संकटांवर मात करण्याच्या वृत्तीचा—प्रेरणादायी उत्सव आहे.

गुरु तेग बहादुर यांचे बलिदान : दीपस्तंभासारखे मार्गदर्शन

“कोणाला घाबरवू नका आणि कोणाचे भय बाळगू नका” हा संदेश त्यांच्या जीवनातून स्पष्टपणे दिसून येतो. हा विचार कोणत्याही एका धर्मापुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीस निर्भयतेचा मार्ग दाखवणारा आहे. आधुनिक काळात मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या संदर्भात त्यांचे बलिदान दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी परंपरेने आणि संतांच्या विचारांनी घडलेल्या महाराष्ट्राच्या भूमीत सर्वधर्मसमभाव आणि न्यायाची प्रेरणा कायम जपली गेली आहे. अशा भूमीत ‘हिंद-दी-चादर’ स्मरणोत्सवाचे आयोजन करणे म्हणजे विविधतेतील एकतेचा पुनरुच्चार होय. हा उपक्रम संविधानिक मूल्ये आणि परस्पर सन्मान बळकट करण्याचा प्रयत्न आहे.

तीन टप्प्यांत समागम कार्यक्रम

१) महाराष्ट्रात तीन टप्प्यांत ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीदी समागमाचे आयोजन.

२) पहिला टप्पा – ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे.

३) दुसरा टप्पा – २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे.

४) तिसरा टप्पा – २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई (खारघर) येथे.

या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

युवा पिढीपर्यंत गुरु तेग बहादुर यांच्या शौर्याचा इतिहास पोहोचविण्याचा प्रयत्न

शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासी तसेच भगत नामदेव संप्रदाय (वारकरी) या समाजांच्या प्रतिनिधींचा सहभाग

३५० व्या शहिदी वर्षानिमित्त संकल्पपूर्ती कार्यक्रम

अध्यात्मिक साधना, ऐतिहासिक जागृती, युवकांचा सहभाग आणि सामाजिक एकात्मतेचा समन्वय

            या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणजे सेवा भावनेतून आयोजित करण्यात येणारा भव्य लंगर, जो समानता, करुणा आणि निःस्वार्थ सेवेचे प्रतीक आहे. सर्व समुदायांच्या स्वयंसेवकांचा सहभाग यामध्ये असणार आहे. सामाजिक सलोखा, आंतरसमुदायिक समज आणि सामायिक वारशाच्या स्मरणाला चालना देणे हा या उपक्रमामागील व्यापक उद्देश आहे.

            गुरु तेग बहादुर साहिबजींचे बलिदान केवळ एका धर्मापुरते मर्यादित नसून मानवी मूल्यांच्या संरक्षणासाठी होते. त्यांच्या गौरवशाली इतिहासाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा, यासाठी हा शहीदी समागम आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ एकदिवसीय कार्यक्रम नसून प्रत्येक गावात, वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा व्यापक प्रयत्न आहे. शीख गुरुंचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले आहे.

            गुरु नानक देवजींच्या एकात्मता आणि मानवतेच्या विचारांनी समाजाला जोडण्याचे कार्य केले. त्याच परंपरेचा संदेश घेऊन सर्व समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून होत आहे.

– वर्षा फडके-आंधळे

  उपसंचालक (वृत्त)

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!