कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावाद आणि तथागत बुद्धांचा मानवतावाद या दोन ग्रंथांचे प्रकाशन

दर्पण न्यूज कोल्हापूर, अनिल पाटील
मानवी समाजाचा इतिहास बदलाचा असून चांगल्या गोष्टी घडण्यासाठी अनेक बदल भारतीय जनमानसाने पाहिले आहेत. तथागत बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी तत्त्वज्ञान जग बदलाला मदत करणारे आहे असे प्रतिपादन सातारचे ज्येष्ठ विद्रोही साहित्यिक व विचारवंत पार्थ पोळके यांनी केले.
ते निर्मिती प्रकाशन, प्रकाशित ज्येष्ठ लेखक आणि माजी सीमाशुल्क अधिकारी मदन पवार, लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावाद आणि धम्म चळवळीच्या अभ्यासिका, अॅड. करुणा विमल, लिखित तथागत बुद्धांचा मानवतावाद या दोन महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथाचा प्रकाशन समारंभ प्रसंगी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते.
यावेळी न्यायाधीश टी. व्ही. नलावडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावाद आणि तथागत बुद्धांचा मानवतावाद हे दोन्ही ग्रंथ मानवतावादी चळवळीला गती देणारे आहेत. त्यांचा मानवतावाद समजाला योग्य दिशा देणारा असून तो प्रत्येकांनी जोपासला पाहिजे.
कार्यक्रमांचे अध्यक्ष बहुजन साहित्य कला अकादमी, महाराष्ट्र राज्याचे सचिव संभाजी कांबळे म्हणाले, प्रत्येक संवेदनशील माणूस मानवतावादी असतो आणि प्रत्येक मानवतावादी क्रांतिकारी असतो.
यावेळी प्राचार्य डॉ. डी. आर. भोसले, अनिल म्हमाने, कृष्णात पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
डॉ. अमर कांबळे, सिद्धार्थ कांबळे, मधुकर शिर्के, आझाद नाईकवाडे, अनिता गायकवाड, राजेंद्र कोरे, सुनील जाधव, डॉ. अनिल कवठेकर, संजयकुमार अर्दाळकर, सिद्धार्थ तामगावे, सूर्यकांत घाडगे, डी. वाय. पाटील, सूर्यकांत तोडकर, दिलीप पाटील यांच्यासह कोल्हापुरातील मानवतावादी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक अनिल म्हमाने यांनी केले. सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर यांनी तर आभार अंतिमा कोल्हापूरकर यांनी मानले.



