महाराष्ट्रसामाजिक

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने भिलवडी येथील रमाई बचत गटाला मशिनरींचे वितरण

नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प, सावित्री लोकसंचलित साधन केंद्र अंकलखोप व नारीशक्ती महिला ग्रामसंस्था भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन

  दर्पण न्यूज भिलवडी (अभिजीत रांजणे):- नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प, सावित्री लोकसंचलित साधन केंद्र अंकलखोप व नारीशक्ती महिला ग्रामसंस्था भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिलांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने भिलवडी येथील रमाई बचत गटाला विविध उद्योगासाठी आवश्यक मशिनरींचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमांतर्गत रमाई बचत गटाला रसवंती मशीन, शेवया मशीन, वेफर्स मशीन, कुरवड्या तयार करण्याचे साहित्य, मक्का भरडा मशीन, मसाले कुटण्याचे यंत्र, पोळ्यांचे स्पेशल पीठ व बाजरीचे पीठ तयार करण्यासाठी आवश्यक मशिनरी देण्यात आली. या मशिनरीमुळे महिलांना घरगुती व लघुउद्योग सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मोठी मदत होणार आहे.

महिलांनी उद्योजक व्हावे, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि स्वावलंबी जीवन जगावे या हेतूने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे सामाजिक व आर्थिक सशक्तीकरण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी महिला आर्थिक विकास महामंडळ सांगलीचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे, सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी कल्पेश उमरानीकर तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ सांगलीचे मार्गदर्शक व स्थानिक महिला उपस्थित होत्या. अधिकाऱ्यांनी महिलांना उद्योग वृद्धीसाठी मार्गदर्शन करत उपलब्ध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या उपक्रमामुळे भिलवडी परिसरातील महिलांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास निश्चितच मदत होणार आहे.
यावेळी रूपाली नंदकुमार कांबळे,छाया कांबळे, पुष्पा नांगरे, दिपाली सरकाळे, रूपा कोळी, संजीवनी वारे तसेच ग्रामपंचायत सदस्य रूपाली कांबळे यांच्यासह भिलवडी व परिसरातील विविध बचत गटातील महिला, सामाजिक कार्यकर्ते राहुल कांबळे, आरपीआयचे अमरजीत कांबळे , पत्रकार शशिकांत राजवंत, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!