नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 मतदान केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी

दर्पण न्यूज मिरज /सांगली : नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून, मतदान अधिकारी मतदान साहित्य घेवून दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत, पलूस नगरपरिषद व शिराळा, आटपाडी नगरपंचायत क्षेत्रातील मतदान केंद्र असलेल्या शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांना सोमवार, दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.
सांगली जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत, पलूस नगरपरिषद व शिराळा, आटपाडी नगरपंचायत यांचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडील दि. 11 नोव्हेंबर 2008 च्या आदेशानुसार ज्या दिवशी मतदान अधिकारी/कर्मचारी सर्व मतदान साहित्य घेवून मतदान केंद्राचा ताबा घेतात, त्या दिवशी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील शाळांना सुट्टी देणे आवश्यक आहे. तसेच मतदानाच्या दिवशीसुध्दा शाळांना सुट्टी राहील, याची खात्री करण्याची यावी, असे नमूद आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचना दि. 26 नोव्हेंबर 2025 अन्वये संबंधित नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रामध्ये दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदान अधिकारी मतदान साहित्य घेवून दिनांक 01 डिसेंबर, 2025 रोजी मतदान केंद्रावर पोहोचणार असल्याने मतदान केंद्र असलेल्या शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांना सोमवार, दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.



