56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता, मात्र सिनेमाची जादू प्रेक्षकांच्या मनात कायम अजरामर राहील
चित्रपट समाजमन घडवतात, सामाजिक बदलांना प्रेरित करतात, सांस्कृतिक वारसा जतन करतात आणि भारताच्या वैविध्यपूर्ण समाजात एकतेची भावना दृढ करतात : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

दरवर्षी इफ्फी नवे रंग, नवे अनुभव घेऊन येतो” : माहिती व प्रसारण तसेच संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन
दिग्दर्शक ‘संतोष डावखर’ यांना ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार प्रदान
‘उबेइमार रिओस’ यांना सर्वोत्तम अभिनेता तर ‘जारा सोफिया ओस्तान’ यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा रौप्य मयूर पुरस्कार प्रदान
इराणी दिग्दर्शक हेसाम फराहमंद आणि एस्टोनियन दिग्दर्शक टोनीस पिल यांना दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान (संयुक्त विजेते)
दर्पण न्यूज गोवा पणजी (अभिजीत रांजणे ):-
गेले नऊ दिवस सिनेमाचा उत्सव साजरा करणाऱ्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समृद्ध आणि संस्मरणीय प्रवासाचा आज गोव्यातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे दिमाखात समारोप झाला. मोहक सांस्कृतिक सादरीकरणांनी उजळलेला आणि देश-विदेशातील नामांकित चित्रपट व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीने सुशोभित झालेला हा समारोप समारंभ—सिनेमा, संस्कृती आणि कथाकथनाच्या या प्रतिष्ठित महोत्सवाच्या आणखी एका संस्मरणीय आवृत्तीची सांगता घडवणारा आणि पुढील आवृत्तीबाबतची उत्सुकता आता अधिक वाढवून गेला.
गेल्या नऊ दिवसांमध्ये महोत्सवातील विविध स्थळांवर प्रदर्शित झालेल्या प्रभावी चित्रपटांनी आणि रंगतदार कलात्मक सादरीकरणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि जागतिक कलात्मकतेची एका व्यासपीठावर झालेली प्रभावी एकत्र येण्याची अनुभूती दिली.
उदयोन्मुख तसेच प्रख्यात कलाकारांच्या उपस्थितीने खुललेले रेड-कार्पेट क्षण, भव्य सांस्कृतिक कार्यक्रम, आणि उत्कृष्ट तसेच नवोदित प्रतिभेला गौरवान्वित करणारे पुरस्कार वितरण—या सर्वांनी समारोप समारंभाला एक अविस्मरणीय रंगत दिली.
इफफीची सांगता थायलंडचे दिग्दर्शक रॅचापूम बूनबुंचाचोक दिग्दर्शित ‘अ युजफुल घोस्ट’ या समारोप चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनााने झाली. या चित्रपटाला जगातील अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय महोत्सव आणि पुरस्कार मंचांवर प्रशंसा मिळाली आहे.
सायंकाळच्या उत्सवी वातावरणात सर्वाधिक लक्ष वेधून घेतला तो प्रतिक्षित पुरस्कारांचा क्षण—ज्यात चित्रपट निर्मितीच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिग्दर्शक, कलाकार आणि निर्मात्यांना गौरविण्यात आले.
स्किन ऑफ युथ या व्हिएतनाम, सिंगापूर, जपान यांची संयुक्त निर्मिती असलेल्या चित्रपटाने इफ्फी 2025 मध्ये सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला
चित्रपट ‘स्किन ऑफ युथ’ या व्हिएतनामी चित्रपटाने इफ्फीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सर्वात प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला. चित्रपटाची दिग्दर्शिका एॅशली मेफेअर यांना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय माहिती व प्रसारण आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या हस्ते सुवर्ण मयूर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मराठी दिग्दर्शक ‘संतोष डावखर’ यांना ‘गोंधळ’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला
गोंधळ या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक संतोष डावखर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील गोंधळ या लोककला प्रथेच्या पार्श्वभूमीवर उभा राहणारा हा चित्रपट—प्रेम, फसवणूक, स्वातंत्र्याची धडपड आणि नियती यांची रोमहर्षक कथा सांगतो. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय माहिती व प्रसारण आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री एल मुरुगन यांनी हा रौप्य मयूर पुरस्कार संतोष डावखर यांना प्रदान केला.

सर्वोत्कृष्ट अभिनेता(पुरुष) साठीचा रौप्य मयूर पुरस्कार : उबेइमार रिओस
‘अ पोएट’ या कोलंबियन चित्रपटातल्या व्यक्तिरेखेसाठी ‘उबेइमार रिओस’ यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता(पुरुष) साठीचा रौप्य मयूर पुरस्कार मिलाला आहे. ऑस्कर हा एकेकाळी गौरवलेला कवी होता, पण ज्यांनी त्याला साथ दिली त्यांच्याबद्दलच्या कडवट नाराजीमुळे तो प्रतिष्ठेपासून दूर गेला. अभिनेता उबेईमार रियोसच्या प्रभावी पहिल्या अभिनयातून एक वेदनाग्रस्त, पराभूत आणि गंभीर भावनिक संकटात सापडलेला ऑस्कर समोर येतो. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय माहिती व प्रसारण आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या हस्ते चित्रपटाचे दिग्दर्शक सिमोन मेसा सोतो यांनी रौप्य मयूर पुरस्कार स्वीकारला.

सर्वोत्कृष्ट अभिनेता(स्त्री) साठीचा रौप्य मयूर पुरस्कार : जारा सोफिया ओस्तान
‘लिटिल ट्रबल गर्ल्स’ या चित्रपटातल्या व्यक्तिरेखेसाठी ‘यारा सोफिया ओस्तान’ यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता(स्त्री) साठीचा रौप्य मयूर पुरस्कार देण्यात आला. तिच्या अत्यंत सूक्ष्म आणि भावपूर्ण अभिनयासाठी — जणू तिचा चेहराच एखाद्या उघड्या पुस्तकासारखा वाटतो. अनेक अर्थांनी, आपणच त्या कथेतील प्रमुख पात्र बनतो — तिच्या जाणिवा, विचार, संवेदना आणि अंतर्मनात होणारे जागृतीचे साक्षी बनतो. केंद्रीय माहिती व प्रसारण आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री एल मुरुगन आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा पुरस्कार प्रदान केला. चित्रपटाचे निर्माते मिहेक चेर्नेच यांनी यारा च्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

विशेष परीक्षक पारितोषिकासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार : अकिनोला डेव्हिस ज्युनिअर
‘माय फादर्स शॅडो’ या चित्रपटासाठी ‘अकिनोला डेव्हिस ज्युनिअर’ यांचा विशेष परीक्षक पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. १९९३ मधील नायजेरियातील अस्थिर निवडणूक काळाच्या पार्श्वभूमीवर फोलारिन आणि त्याच्या दोन मुलांचा लागोसकडे थकलेला पगार मिळवण्यासाठीचा प्रवास, प्रेम, पालकत्व आणि पुनर्मिलनाची भावनिक कथा उलगडतो. केंद्रीय माहिती व प्रसारण आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री एल मुरुगन आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा पुरस्कार प्रदान केला.

दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : हेसाम फराहमंद आणि टोनीस पिल यांना संयुक्तपणे जाहीर
इराणच्या ‘माय डॉटर्स हेअर’ आणि एस्टॉनियाच्या ‘फ्रँक’ या चित्रपटांसाठी हेसाम फराहमंद आणि टोनीस पिल यांना संयुक्तपणे दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी रौप्य मयूर पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार जागतिक स्तरावरील चित्रपटातल्या नव्या आश्वासक प्रतिभेकडे लक्ष वेधतो. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय माहिती व प्रसारण आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘केसरी चॅप्टर 2’ या चित्रपटासाठी ‘करण सिंग त्यागी’ यांनी भारतीय चित्रपटासाठीचा ‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार पटकावला
भारतीय सिनेमाच्या उत्क्रांतीत युवा प्रतिभावंतांच्या योगदानाची दखल घेत देशभरात चित्रपट निर्मिती करणाऱ्या युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने इफ्फीमध्ये भारतीय चित्रपटासाठीचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार सुरू केला आहे. ‘केसरी चॅप्टर २’ या चित्रपटाला त्याच्या सिनेमॅटिक मूल्यांमुळे, ऐतिहासिक महत्त्वामुळे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या निर्णायक क्षणांचे प्रभावी चित्रण केल्याबद्दल हा सन्मान प्रदान केला गेला आहे. करण सिंग त्यागी यांना हा पुरस्कार माहिती व प्रसारण आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री एल मुरुगन आणि सचिव संजय जाजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

नाॅर्वेच्या एरिक स्वेन्सन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सेफ हाऊस’ चित्रपटाचा आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकाने सन्मान
गोवा येथे आयोजित 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नाॅर्वेच्या एरिक स्वेन्सन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सेफ हाऊस’ चित्रपटाने प्रतिष्ठित आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकावर नाव कोरले. २०१३ मधील मध्य आफ्रिकी प्रजासत्ताकातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट, डाॅक्टर असलेल्या लिन तिच्या टीमचे संरक्षण आणि जीव धोक्यात असलेल्या व्यक्तीचे रक्षण यामधील कठीण निवड करताना उलगडणाऱ्या थरारक घटनांची सत्यकथनावर आधारित कथा सांगतो. सेफ हाऊस या चित्रपटाच्या वतीने हा पुरस्कार आयसीएफटी जुरी मनोज कदम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

‘बंदिश बँडेट्स सिझन 2’ या वेब सिरीजला इफ्फी 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार
‘बंदिश बँडेट्स सिझन 2’वेब सिरीजला 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार मिळाला आहे. या मालिकेचे निर्माते अमृतपाल सिंह बिंद्रा आणि आनंद तिवारी यांना हा पुरस्कार माहिती व प्रसारण आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री एल मुरुगन आणि सचिव संजय जाजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

विशेष सन्मान
दीडशेहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केलेल्या सुपरस्टार रजनीकांत यांच्या सुवर्णमहोत्सवी चित्रपट कारकिर्दीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी रजनीकांत यांनी या सन्मानाबद्दल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच गोवा सरकारचे आभार मानले. चित्रपट सृष्टीत घालवलेली 50 वर्षे 10 -12 वर्षांसारखी वाटली आणि पुन्हा एकदा रजनीकांत म्हणूनच जन्म घ्यायला आवडेल असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय माहिती व प्रसारण आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री एल मुरुगन,केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि अभिनेते रणवीर सिंह यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

इफ्फीच्या समारोप समारंभात उपस्थितांना संबोधित करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे सर्व विजेत्यांचे विशेष अभिनंदन केले. प्रभू रामचंद्र यांच्या 77 फुटी मूर्तीचे उद्घाटन करण्यासाठी ते आज गोव्यात आले होते अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले की आज आपण चित्रपटांचा उत्सव साजरा करण्यासाठी जमलो आहोत. हा केवळ एका महोत्सवाचा समारोप नव्हे तर हे सर्जनशील मने, कलात्मक प्रतिभा आणि जागतिक सहयोगाच्या उल्लेखनीय मेळाव्याचे एकत्रीकरण आहे. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून ते सार्वजनिक जाणीवेला आकार देणारे, अर्थपूर्ण बदलांना चालना देणारे आणि समाजाला प्रामाणिकपणा आणि गहनतेचे दर्शन घडवणारे माध्यम आहे असे ते म्हणाले. चित्रपटांनी सामाजिक जनजागृती करण्यात, तरुणांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात, सांस्कृतिक वारशाचे दस्तवेजीकरण करण्यात आणि आपल्या वैविध्यपूर्ण देशामध्ये ऐक्याची भवन जोपासण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या काही दिवसांत आपण अद्वितीय संकल्पना, संस्कृती आणि दृष्टीकोनांचे एकत्रीकरण होताना बघितले आहे. या महोत्सवातील प्रत्येक सादरीकरण, प्रत्येक संवाद आणि प्रेक्षकांनी वाजवलेली प्रत्येक टाळी यांनी इफ्फी 2025 च्या अविस्मरणीय अनुभवत मोलाची भर घातली आहे असे ते म्हणाले.
दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत ते म्हणाले धर्मेंद्र यांच्या योगदानाने या चित्रपटसृष्टीच्या पायाभरणीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनतर, आजच्या सर्व पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन करत मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी रजनीकांत यांना देण्यात आलेल्या जीवन गौरव पुरस्काराचा विशेष उल्लेख केला.
या महोत्सवातील चित्रपटांचे मूल्यांकन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाचे देखील त्यांनी विशेष आभार मानले. गेली अनेक वर्षे या महोत्सवाचे यजमानपद सांभाळणारे गोवा राज्य यापुढेही चित्रपटनिर्मात्यांचे तसेच चित्रपट रसिकांचे उत्साहाने स्वागत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण, संसदीय व्यवहार, मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकास राज्यमंत्री एल.मुरुगन म्हणाले की, या महिन्याच्या 20 तारखेला उद्घाटन झालेल्या इफ्फीचे विशेष आकर्षण म्हणजे विविध राज्ये, चित्रपट स्टुडीओ यांनी सादर केलेले चित्ररथ. दर वर्षी इफ्फी मध्ये वेगवेगळ्या आकर्षणांची भर पडत आहे. या वर्षी वेव्हज बाजार कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 1050 कोटी रुपयांची उलाढाल झाली. महिला शक्तीला सक्षम करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला जोड देत या इफ्फी मध्ये 50 महिला चित्रपट निर्मात्यांचा समावेश आहे करण्यात आला आहे याची त्यांनी आवर्जून नोंद घेतली.
या वर्षीच्या महोत्सवातील फिल्म बाजारमुळे मोठी गुंतवणूक आली, यंदा पहिल्यांदाच एआय हॅकथॉनचे आयोजन करण्यात आले, तर ‘क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टुमॉरो’ या उपक्रमात तब्बल 125 प्रतिभावान तरुणांनी सहभाग नोंदवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेव्हज परिषदेवेळी ही ऑरेंज इकॉनॉमीची पहाट असल्याचे म्हटले होते. आणि आता या महोत्सवाने त्या दिशेची वाटचाल पुढे नेली आहे. या महोत्सवातून आपल्या कलाकारांना संधी तर उपलब्ध झाल्या, त्यासोबतच भारताचे नावही संपूर्ण जगभरात पोहचवले. या महोत्सवामुळे केवळ भारतीय कलाकार आणि सर्जकांना संधी निर्माण झाल्या नाहीत, तर भारताचे सांस्कृतिक आणि कलात्मक सामर्थ्य जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे कार्यही झाले.
“या महोत्सवातील ‘क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टुमॉरो’ या आव्हानात्मक उपक्रमामुळे भविष्यातील रजनीकांतसारखे कलाकार घडतील,” असे मत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी व्यक्त केले. श्री. जाजू यांनी यावेळी सांगितले की, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) ही संस्था निर्मात्यांना त्यांच्या कौशल्य आणि सर्जनशीलतेत अधिक प्रावीण्य मिळविण्यासोबतच, सर्जनशील उत्पादन प्रक्रियेतील तंत्रज्ञानाचे ज्ञानही देणार आहे. एनएफडीसी च्या आयआयसीटी कॅम्पसचे कार्य सुरू झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मुंबई येथील आयआयसीटी हे हब अँड स्पोक मॉडेलवर कार्य करणार असून, देशभरातील निर्माते आणि सर्जकांसाठी ते एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्त्वांना आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यंदा दिवंगत झालेल्या धर्मेंद्र, कामिनी कौशल, सुलक्षणा पंडित, सतीश शाह, पियूष पांडे, ऋषभ टंडन, गोवर्धन असराणी, पंकज धीर, वरिंदर सिंह घुमन, जुबीन गर्ग, बाळ कर्वे, जसविंदर भल्ला, ज्योती चांदेकऱ, रतन थियाम, बी. सरोजा देवी, शेफाली जरीवाला, पार्थो घोष, विभू राघवे, शाजी एन. करुण, मनोज कुमार, आलोक चॅटर्जी, श्याम बेनेगल आणि झाकिर हुसेन यांसारख्या महान कलाकारांच्या अमूल्य योगदानाची आठवण या प्रसंगी करण्यात आली.
या कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतील नामांकित व्यक्तिमत्त्वे रमेश सिप्पी, नवाजुद्दीन सिद्दीकी, अभय सिन्हा, ओमप्रकाश मेहरा आणि किरण शांताराम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महोत्सव संचालक शेखर कपूर, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रकाश मगदूम, ESG गोवा अध्यक्षा देलैला लोबो, तसेच रवि किशन, ऋषभ शेट्टी, रणवीर सिंग, अमित साद, निहारिका कोणीदेला आणि जी. व्ही. प्रकाश कुमार यांची उपस्थिती होती.
गणेश वंदनेपासून ते पारंपरिक नृत्यप्रकार, दिव्यांग कलाकारांची अप्रतिम सादरीकरणे, ईशान्य भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे दर्शन, कर्नाटकच्या यक्षगान या लोकनाट्य प्रकाराचे प्रदर्शन, तसेच राजस्थानातील मंगनियार कलाकारांच्या सादरीकरणांपर्यंत—कार्यक्रमाने भारतीय वारशाची विविधता, संपन्नता आणि रंगतदार सांस्कृतिक परंपरा अधोरेखित केली.

समारोप समारंभात भारतीय सांकेतिक भाषेतील दुभाष्यांची उपस्थिती ही या महोत्सवाच्या सर्वसमावेशकतेची जाणीव करून देणारी ठरली. महोत्सवाच्या नऊ दिवसांत इफ्फी परिसरात राबविण्यात आलेल्या दिव्यांग-मैत्रीपूर्ण उपाययोजनांतूनही ही समावेशक भूमिका स्पष्टपणे दिसून आली.
परीक्षक मंडळ अध्यक्ष ओम प्रकाश मेहरा यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटांविषयी बोलताना मंत्रालयाचे आभार मानताना ते म्हणाले की, मी जगभरात विविध चित्रपट महोत्सवाला हजार राहिलो आहे.या वर्षी मंत्रालयाने या महोत्सवाच्या सादरीकरणात दाखवलेली व्यावसायिकता उल्लेखनीय आहे. प्रत्येक क्षणाचे अचूक व्यवस्थापन झाल्यामुळे या महोत्सवाच्या आयोजनाला चार चंद लागले असे त्यांनी सांगितले.
या वर्षी महोत्सवात प्रथमच एआय चित्रपट महोत्सव व सिनेमा एआय हॅकेथॉन यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कथाकथन आणि चित्रनिर्मिती क्षेत्रात नवकल्पनांना चालना देणारे व्यासपीठ उपलब्ध झाले. क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो (CMOT) या उपक्रमात यंदा विक्रमी 799 अर्ज प्राप्त झाले असून, 124 सहभागी 13 विविध चित्रपटनिर्मिती कौशल्यांचे प्रतिनिधित्व करतात. शॉर्ट्स टिव्ही सह 48 तासांचा फिल्ममेकींग चॅलेंज हा या आवृत्तीचा विशेष आकर्षण ठरला.
56 व्या IFFI दरम्यान आयोजित वेव्हस् फिल्म बाजार 2025 ने भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक निर्मिती, सहकार्य आणि वितरणाच्या केंद्रस्थानावर अधोरेखित केले. यावर्षी मोठा आंतरराष्ट्रीय सहभाग, महत्त्वपूर्ण सर्जनशील सहकार्य तसेच उद्योगातील व्यावसायिक, निर्माते व वितरकांसाठी अभूतपूर्व संधी उपलब्ध झाल्या. महोत्सवात आयोजित संवाद, मास्टरक्लासेस, राउंडटेबल्स आणि चर्चासत्रांमधून अनेक आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक आणि सर्जकांनी ज्ञानसंवर्धनात्मक चर्चांना दिशा दिली.
चित्रपट, सर्जनशीलता आणि कथाकथनाचा उत्सव साजरा करणारा 56 वा IFFI महोत्सव केवळ चित्रप्रेमींच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवणारा ठरला नाही, तर देशाच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेलाही बळकट करणारा ठरला. आता पुढील आवृत्तीची प्रतीक्षा सुरू झाली आहे, जी पुन्हा एकदा जागतिक दर्जाच्या चित्रपट, कलाकार आणि सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करणार आहे.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा आहे



