आमीर खानच्या उपस्थितीत गाजली 56 व्या इफ्फीची शेवटची ‘फायरसाईड चॅट’

आपल्या हजरजबाबीपणा, चातुर्य आणि प्रभावी वक्तृत्वाने ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ने गाजवली इफ्फी 2025 ची सांगतापूर्व संध्याकाळ
“मला माझ्या प्रेक्षकांना—आणि स्वतःलाही आश्चर्यचकित करायला आवडते”: आमीर खान
“मी पूर्णपणे एक ‘चित्रपटमय’ व्यक्तिमत्त्व आहे, कार्यकर्ता नाही. माझा मुख्य उद्देश माझ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा आहे”: आमीर खान
“ज्या दिवशी मी जाणीवपूर्वक दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेईन, तेव्हा कदाचित मी अभिनय करणे थांबवेन.”
दर्पण न्यूज गोवा पणजी अभिजीत रांजणे -:
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) 56 व्या आवृत्तीची “द नॅरेटिव्ह आर्किटेक्ट ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन अँड इनक्लुझिव्हिटी” या शीर्षकाखालील शेवटची ‘फायरसाईड चॅट’ प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपटकर्ते आमीर खान यांनी खचाखच भरलेल्या आणि टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करणाऱ्या कला अकादमी मध्ये प्रवेश करताच रंगतदार झाली.

सत्र संचालक आणि प्रसिद्ध चित्रपट समीक्षक भारद्वाज रंगन यांनी दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहून सत्राची सुरुवात केली. आमीर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत म्हटले, “मी धरमजींना पाहतच मोठा झालो आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जात असले तरी, रोमान्स, कॉमेडी आणि ड्रामा यासह सर्वच प्रकारांमध्ये ते तितकेच तरबेज होते; त्यांच्यात अभिनयाची जातकुळी आणि प्रभाव विलक्षण होता. ते एक अत्यंत साधे आणि उत्कृष्ट अभिनेते होते. भाषेवरील त्यांचे प्रभुत्व, मिळालेली प्रतिष्ठा आणि कलाकार म्हणून त्यांची असामान्य शैली यामुळे ते स्वतःच एक संस्था होते. त्यांचे निधन हे एक मोठे वैयक्तिक आणि कलात्मक नुकसान आहे.”

आणि त्यानंतर पुढचा दीड तास ‘आमीर खान शो’ हळूहळू उलगडत गेला; याची सुरुवात त्यांच्या सिनेप्रवासाची पाळेमुळे गोष्ट सांगण्यावर असलेल्या आयुष्यभराच्या प्रेमात कशी रुजलेली आहेत, या वर्णनाने झाली. बालपणापासूनच आजीने सांगितलेल्या गोष्टी आणि रेडिओवरील ‘हवा महल’च्या जादूने त्यांना भुरळ घातली होती, असे त्यांनी सांगितले— या क्षणांनीच त्यांच्या सर्जनशील वृत्तीला आकार दिला. “मला नेहमीच कथांचे आकर्षण वाटत आले आहे. त्या माझ्या बालपणाचा एक मोठा भाग होत्या आणि त्याच आकर्षणाने अभिनेता म्हणून मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला मार्गदर्शन केले आहे,” अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.
परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने त्याच्या अनोख्या शैलीत दाखवून दिले की, सिनेमाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कधीच हिशेबी नव्हता; तो नेहमीच सहज राहिला आहे: “मी स्वतःची पुनरावृत्ती करू शकत नाही. एकदा मी एका विशिष्ट प्रकारचा चित्रपट केला की, मला पुढे जायचे असते. मी अशा कथा शोधतो ज्या नवीन , अनोख्या आणि सर्जनशीलदृष्ट्या रोमांचक वाटतील.”
त्यांनी चित्रपटांविषयी त्यांच्या सहजतेच्या दृष्टिकोनाबाबत अधिक विस्तृतपणे सांगितले . ते म्हणाले की, या क्षेत्रातील बरेच लोक अॅक्शन, कॉमेडी किंवा बॉक्स ऑफिसवर जे काही उत्तम चालत आहे त्या ट्रेंडचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांनी कधीही अशा प्रकारे काम केलेले नाही. “मी कथेबद्दलच्या माझ्या भावनिक उत्साहाच्या आधारे चित्रपट निवडतो, भले ते पूर्णपणे इथल्या मानकांच्या विरुद्ध असले तरीही,” असे ते म्हणाले. “माझे बहुतेक निर्णय उद्योग मानकांनुसार अव्यवहार्य राहिले आहेत. ज्यावेळी आम्ही ‘लगान’ बनवत होतो, त्यावेळी जावेद साहेबांनी आम्हाला तो न करण्याचा सल्ला दिला होता . तात्विकदृष्ट्या , मी प्रसिद्ध चित्रपट कलाकार बनायला नको होते, कारण मी प्रत्येक नियम मोडला. पण तरीही, त्या अपारंपरिक निवडी लोकांशी जोडल्या गेल्या आहेत आणि मी त्यांचा मनापासून आभारी आहे,” असे ते पुढे म्हणाले.
प्रेक्षकांचा अनुभव हा सर्वोपरि आहे यावर त्यांनी भर दिला: “लोक चित्रपटगृहात समाजशास्त्र व्याख्यान ऐकण्यासाठी येत नाहीत. त्यांना भावना, रहस्य, हास्य किंवा नाट्य यात गुंतून राहायचे असते. माझी प्राथमिक जबाबदारी त्यांचे मनोरंजन करणे ही आहे.”
आमिरने सांगितले की त्याचे चित्रपट पूर्णपणे अंतःप्रेरित असतात. आमिर पुढे म्हणाला, “पुढे कुठल्या सामाजिक विषयावर बोलायचे आहे हा विचार करून मी चित्रपटाची निवड करत नाही. मी त्या पटकथा निवडतो ज्या माझ्या मनाला भावतील . जर कुठली उत्तम पटकथा चांगला सामाजिक संदेश देत असेल तर तो बोनस आहे, सुरुवात नाही,” असे ते पुढे म्हणाले.
त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये सामाजिक मुद्दे आले आहेत याबद्दल बोलताना आमिर पुढे म्हणाला, “असे वाटू शकते ते जाणूनबुजून केलेले आहे, पण तसे नव्हते. त्या कथा माझ्याकडे स्वाभाविकपणे आल्या. कदाचित हेच ते विषय आहेत ज्यांच्याशी मी जोडला जाऊ शकतो आणि कदाचित मी भाग्यवान आहे, मला अपवादात्मक पटकथा मिळाल्या.”
आमिर खानने, आपल्या गाजलेल्या प्रमुख चित्रपटांच्या लेखकांना याचे मनापासून श्रेय दिले: “मग ते ‘तारे जमीं पर’ असो, ‘थ्री इडियट्स’ असो ,’ दंगल’ किंवा ‘लापता लेडीज’ असो, त्याचा पाया लेखकांनी घातला होता. त्यांनी ते जग आणि पात्रे निर्माण केली – ज्यांनी मला प्रभावित केले, केवळ अशाच पटकथांकडे मी आकर्षित झालो.” मागे वळून पाहताना, या चतुरस्त्र अभिनेत्याने पुढे सांगितले, “माझे बरेच चित्रपट सामाजिक समस्यांवर भाष्य करणारे असतात, मात्र ते स्वाभाविकतेने त्यामध्ये आले आहे, मुद्दाम घडवले नाही , नियोजनपूर्वक नाही .”
“मी एक संपूर्ण ‘चित्रपटमय’ व्यक्तिमत्व आहे, कार्यकर्ता नाही. माझ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हे माझे प्राथमिक उद्दिष्ट आहे”, असे त्यांनी प्रामाणिकपणे सांगितले.

एका महत्त्वाच्या क्षणी आमिर खान यांनी आपल्या आगामी योजना देखील उघड केल्या. ते म्हणाले, “मी निर्मिती केलेले सध्याचे प्रकल्प- लाहोर 1947, हॅपी पटेल आणि काही इतर – पूर्ण झाल्यानंतर, त्या सर्वांचे काम पुढील काही महिन्यांत पूर्ण होईल, त्यानंतर मी माझे लक्ष पूर्णपणे निर्मितीपासून अभिनयाकडे वळवणार आहे.”
त्यांनी रंगमंचावरून एक मोठा संरचनात्मक बदल जाहीर केला: “येथून पुढे, मी ऐकणाऱ्या कोणत्याही पटकथेसाठी मी फक्त अभिनेता म्हणून असेन. हा एक महत्त्वाचा बदल आहे, परंतु पुन्हा अभिनयासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करण्याची ही योग्य वेळ आहे.”
पुढे काय होईल याबद्दल आमिर म्हणाले, “मी आता नवीन पटकथा ऐकत आहे. काहींनी मला उत्साहित केले आहे – विशेषतः दोन किंवा तीन – पण मी अजूनही निवड प्रक्रियेत आहे.”
ज्यावेळी रंगन यांनी त्यांना विचारले, “जर प्रेक्षकांमधील कोणत्याही चित्रपट निर्मात्यांना तुमच्यासमोर एखादा प्रकल्प सादर करायचा असेल तर त्यांनी कसा दृष्टिकोन ठेवावा”, तेव्हा आमिर यांनी लगेच उत्तर दिले, “ते फक्त माझ्या व्यवस्थापकाशी संपर्क साधू शकतात आणि कथनासाठी वेळ मागू शकतात किंवा पटकथा पाठवू शकतात. कधीकधी मी पटकथा वाचण्यास प्राधान्य देतो, आणि कधीकधी मी ती ऐकण्यास प्राधान्य देतो – म्हणून दोन्हीपैकी कोणताही दृष्टिकोन उपयोगी ठरेल.”
या शेकोटीजवळच्या गप्पांचा शेवट आमीर खान यांच्या दिग्दर्शनाच्या प्रवासातील भाकितांनी झाला, “दिग्दर्शन हे खरंतर माझं मोठं प्रेम आहे. चित्रपट निर्मिती ही मला सर्वात जास्त आवडते. मी एकदा दिग्दर्शन केले होते, पण ते संकट आल्याने करावे लागले होते – म्हणून ते खरोखरच नियोजित पाऊल म्हणून गणले जात नाही. पण ज्या दिवशी मी जाणीवपूर्वक दिग्दर्शन स्वीकारण्याचा निर्णय घेईन, त्या दिवशी मी कदाचित अभिनय करणे थांबवेन, कारण ते मला पूर्णपणे खाऊन टाकेल. म्हणूनच मी सध्या तो निर्णय पुढे ढकलत आहे.”
सत्राच्या शेवटी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आमिर यांचा सत्कार केला.

इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.



