अनुकंपा भरतीतून 78 कुटुंबांना मिळाले आर्थिक स्थैर्य आणि जगण्याचा आधार

दर्पण न्यूज सांगली : आपल्या प्रियजनांचा अकाली मृत्यू ही कोणत्याही कुटुंबासाठी मोठी शोकांतिका असते. पण अशा संकटग्रस्त कुटुंबांना शासनाने दिलेली अनुकंपा भरती ही फक्त नोकरी नसून, यातून या उमेदवारांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येऊन जगण्याचा आधार मिळणार आहे. शनिवारी सांगली जिल्ह्यात अनुकंपा तत्त्वावर 78 उमेदवारांना तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या 61 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. या क्षणाने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले, तर “आजच आमच्या कुटुंबात दिवाळी आली” अशी भावना उमटली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवस कार्यक्रमांतर्गत प्रलंबित अनुकंपा प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचनेनंतर, ही प्रक्रिया मिशन मोडवर राबवण्यात आली. यातून सांगली जिल्ह्यात गट ‘क’ व गट ‘ड’ मध्ये 78 उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर तर 61 उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अशा एकूण 139 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यासाठी नियुक्त उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हा प्रशासनाने मनोमन आभार मानले.
मानसिक समाधान मिळाले – श्रेयस मोरे
मूळच्या देवराष्ट्रे येथील असलेल्या श्रेयस लालासाहेब मोरे यांना पाटबंधारे विभागात गट क मध्ये दप्तर कारकून पदावर अनुकंपा तत्त्वावर शनिवारी नियुक्तीपत्र मिळाले. शासकीय सेवेत दाखल होत असल्यामुळे मानसिक समाधान मिळाले असल्याची भावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, माझे वडील लालासाहेब मोरे यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हा मी नुकताच शासकीय कंत्राटदार म्हणून काम करण्यास सुरवात केली होती. मात्र, वडिलांच्या निधनामुळे आणि मी एकुलता एक मुलगा असल्याने संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. मी घरची शेती करू लागलो. पण, शेती हा व्यवसाय अनिश्चित असल्याने मनात असुरक्षिततेची भावना होती. पण, अनुकंपा भरतीतून मला नियुक्तीपत्र मिळाल्याने आता कुटुंबाला आर्थिक स्थैर्य आणि जगण्याचा आधार मिळाला असल्याचे ते म्हणाले.
संघर्षास विराम – रत्नाकर कांबळे
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथील रत्नाकर सिद्धू कांबळे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभागात लिपिक पदावर नियुक्तीपत्र मिळाले. यामुळे आपला संघर्ष थांबला असल्याची भावना व्यक्त केली आहे. रत्नाकर कांबळे म्हणाले, माझे वडील प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विभाग, मिरज येथे कार्यरत होते. पंधरा वर्षांपूर्वी त्यांचे अकस्मात निधन झाले. तेव्हा मी बारावीत शिकत होतो. घऱची जबाबदारी अंगावर आल्याने शिक्षण पूर्ण करता आले नाही. एमआयडीसी मध्ये मी कामाला जात होतो. आर्थिक व मानसिक परिस्थिती दोन्हींचा संघर्ष सुरू होता. पण, आता मला अनुकंपा मधून नियुक्ती मिळाल्याने माझ्या संघर्षाला विराम मिळाला आहे, असे ते म्हणाले.
कुटुंबाचे भविष्य सुरक्षित – यासिन मुतवल्ली
मिरज येथील यासिन इब्राहिम मुतवल्ली यांच्या वडिलांचे 11 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचे वडील प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विभाग, मिरज येथे कार्यरत होते. वडील गेल्यानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केले. परंतु, एका मेडिकलमध्ये ते कामाला जात. यासिन मुतवल्ली यांना शासकीय रूग्णालय येथे नियुक्ती मिळाली आहे. आता आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित झाले असून, या माध्यमातून मुलांना चांगले शिक्षण देता येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात नवा प्रकाश आला असून, शासनाच्या संवेदनशील दृष्टिकोनाचा प्रत्यय आल्याची भावना या प्रातिनिधीक प्रतिक्रियांतून उमटली आहे. शासनाच्या अनुकंपा भरती या एक महत्त्वाचा उपक्रमातून सेवेत असताना शासकीय कर्मचाऱ्यांचा अकाली मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटू नये आणि वारसदारांना आधार दिला जातो. त्यामुळेच या उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हा प्रशासनाने मनोमन आभार मानले. या भरतीमुळे 78 कुटुंबातील पात्र वारसदारांना रोजगार मिळाला आहे, यापुढे या कुटुंबाचे जीवन सुरळीत चालून त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.