बुर्ली येथील बौद्ध वसाहत नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण ; कारवाईसाठी आरपीआयचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

दर्पण न्यूज पलूस : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील बुर्ली येथील बौद्ध वसाहतीमधील नागरिकांची पिण्याच्या पाण्याबाबत होत असलेली वणवण थांबवण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच अशा उपाययोजना करताना अडथळा निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, याबाबतचे लेखी निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीच्या वतीने पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांच्याकडे देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,बुर्ली गावच्या बौद्ध वसाहतीमध्ये २०१६ पासून पिण्याच्या पाण्यानी गैरसोय होत आहे. सरपंच व ग्रामसेवक यांना २०१९ पासून अनेक वेळा पत्र व्यवहार करून देखील कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केली नसल्याने आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या माहिती नुसार पाईप लाईन केली असून, त्यामध्ये अद्याप पाणी येत नसून, गेली कित्येक वर्षे फक्त बौध्द समाज म्हणून आमच्यावर अन्याय केला जातोय व आमच्या हक्काच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवण्याचे काम तेथील ग्रामसेवक करीत आहेत. याची दाखल घेवून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर व कठोर कारवाई करून, आम्हाला पिण्यास योग्य पाण्याचा पाणीपुरवठा करण्याबाबत तरतुद करण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पलूस तालुका युवक आघाडी यांच्या वतीने संबधित अधिका-यांच्या तोंडाला काळे फासण्यास येईल असा इशारा देण्यात येत आहे अशा आशयाचे निवेदन
पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांना देण्यात आले.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पलूस तालुका युवक आघाडी अध्यक्ष अविनाश काळीबाग, उपाध्यक्ष यश ऐवळे, कार्याध्यक्ष अमरजीत राजवंत, रविंद्र मराठे, प्रणय शिखरे, आदित्य शिखरे, विजय सावंत, महेश सावंत, सिद्धांत शिखरे, आदित्य होवाळ, निशांत धाईंजे, गौरव शिखरे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.