जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी केली तेर येथील वस्तुसंग्रहालयाच्या नवीन इमारतीची पाहणी

दर्पण न्यूज धाराशिव (प्रतिनिधी संतोष खुने) :- धाराशिव तालुक्यातील तेर येथील कै. रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय वस्तुसंग्रहालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.या इमारतीची पाहणी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी आज १३ मार्च रोजी केली.
तेर गावाला दोन हजार वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.येथे कै.रामलिंगअप्पा लामतुरे यांनी संग्रहीत केलेल्या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत.या संग्रहालयात जवळपास २५ हजार वस्तू मांडलेल्या आहेत,ज्यामध्ये मातीच्या वस्तू, खापरे,मणी,दगडांच्या मूर्ती,शाडूच्या मूर्ती,हस्तिदंतावर केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू,शंखांच्या वस्तू,हाडांच्या वस्तू तसेच विविध स्त्री प्रतिमा समाविष्ट आहेत.या संग्रहालयाच्या नवीन इमारतीसाठी शासनाने १५ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता,आणि सध्या हे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.
जिल्हाधिकारी श्री.पूजार यांनी या बांधकामाची पाहणी करून आर्किटेक्टकडून सविस्तर माहिती घेतली.त्यानंतर त्यांनी तेर येथील श्री संत गोरोबाकाका यांच्या समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.या प्रसंगी तेर अभ्यासक रेवणसिद्ध लामतुरे,हभप दिपक महाराज खरात, मंडळ अधिकारी शरद पवार,तलाठी प्रशांत देशमुख,किशन काळे आणि सुमेध वाघमारे आदी उपस्थित होते.