ताज्या घडामोडी

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

प्रजासत्ताक दिनाचा 74 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 

 

– मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात दिली ग्वाही

– समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल

– बळीराजाला बळ देण्यासाठी सिंचन प्रकल्पांना भरीव निधी

– शासकीय आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण करण्यास प्राधान्य

 

 

सांगली : शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक कल्याणकारी योजना राज्य शासन राबवित आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून राज्य शासन वाटचाल करीत आहे. सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात डॉ. खाडे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, उपवनसंरक्षक नीता कट्टे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने, यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना भरीव निधीसह बळीराजाला बळ देण्यासाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पास 8 हजार 272 कोटी रुपयांची पाचवी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. या प्रकल्पातील म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतामध्ये 1 हजार 930 कोटी रूपये मंजूर आहेत. त्यापैकी विविध कामांची 981 कोटींची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण 57 किलोमीटरपैकी 8 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.

तसेच, टेंभू विस्तारीत उपसा सिंचन प्रकल्पाला नुकतीच सव्वा सात हजार कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सद्यस्थितीत या योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दोन्ही योजनांचे काम पूर्ण झाल्यानंतर जत तालुका दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला.

माहे नोव्हेंबर – डिसेंबर 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाईपोटी सुधारित शासन निर्णयानुसार वाढीव दराने 3 हेक्टरच्या मर्यादेत जिल्ह्याची एकूण 58 कोटी रुपये अनुदान मागणी शासनाकडे केली आहे. एक रुपयामध्ये पीक विमा या योजनेतून आजअखेर 62 हजार शेतकऱ्यांना जवळपास सतरा कोटी रूपये अदा केले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून चालू आर्थिक वर्षात विहित मुदतीत कर्ज फेडणाऱ्या 86 हजार शेतकऱ्यांना जवळपास तेरा कोटी रूपये मंजूर केले. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून 81 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे 482 कोटी रूपये वितरीत करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक शासकीय योजना जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने राबविण्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविण्यात सांगली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत जवळपास साडेनऊ लाख लोकांनी आयुष्मान कार्ड काढले आहे.

शासकीय आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण होऊन जिल्ह्यातील गोरगरीब, गरजू रुग्णांना दर्जेदार व उत्तम आरोग्य सुविधा मिळणार असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे एम. आर. आय. नवीन यंत्र खरेदीसाठी 25 कोटी तसेच पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे सी. टी. स्कॅन यंत्र खरेदीकरिता साडेदहा कोटी रूपये नुकतेच जाहीर करण्यात आले. दोन्ही मशिनची खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच, डीपीडीसीमधून विविध विभागांतील अत्याधुनिक यंत्रे व शस्त्रक्रिया साहित्य खरेदी केले आहे, असे त्यांनी सांगितले.

कामगारांचे जीवनमान व आरोग्य उंचावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, राज्यस्तरीय विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या अंमलबजावणीसह नोंदित बांधकाम कामगारांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व आरोग्यविषयक लाभ मोठ्या प्रमाणावर देण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या ई-श्रम कामगार नोंदणी प्रकल्पात आतापर्यंत एकूण 3 लाखाहून अधिक कामगारांची नोंदणी झाली आहे.

जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 साठी एकूण 471 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा प्रस्तावित केला असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, डीपीडीसीच्या निधीमधून जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अधिनस्त 10 कार्यालयास जवळपास पावणेदोन कोटी रूपयांचे 15 अत्याधुनिक रोव्हर मशीन देण्यात आले आहेत. प्लॉटर खरेदीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे भूमि मोजणी प्रकरणांमधील विलंब कमी होऊन, जनतेला अचूक व जलद गतीने सेवा मिळेल. सांगली पेठ रस्त्याचे काम सुरू झाले असून, हा 41 किलोमीटरचा संपूर्ण रस्ता चार पदरी होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

कुपवाड भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन आणि सांगली ते बोरगाव महामार्ग चौपदरीकरण टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. त्याचबरोबर मिरज जंक्शन व भिलवडी या दोन रेल्वे स्थानकांजवळील रेल्वे ओव्हर ब्रिजचे लोकार्पणही करण्यात आले. अशा प्रकल्पांसह सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या भरीव मदतीबद्दल पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.

आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी शासनाने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांवर व त्याच्या जिल्ह्यातील प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेतला. यामध्ये वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठीची सन्मानधन योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून वैयक्तिक व गट कर्ज परतावा, जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल उपक्रम, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा, जिल्ह्याचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा यांचा समावेश आहे.

संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच, पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी देण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, त्यामध्ये कोठेही कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

प्रारंभी राष्ट्रध्वजास सलामी देवून राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉ. खाडे यांनी परेड निरीक्षण केले. प्रारंभी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली.

लष्करात कार्यरत असताना अपंगत्त्व आल्याने शुभम अनिल झांबरे (डोंगरसोनी, ता. तासगाव), रामदास संभाजी गरंडे (सिध्देवाडी, ता. मिरज) यांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते सानुग्रह अनुदान देण्यात आले. तसेच, शत्रूशी लढा देताना जखमी झालेले भरत अगतराव सरक (करगणी, ता. आटपाडी) यांना ताम्रपट प्रदान करण्यात आला. आवास योजना (ग्रामीण) मधील प्रथम तीन सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींचा तसेच मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा गौरव करण्यात आला.

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख विभागास डीपीडीसी निधीमधून प्राप्त रोव्हर मशीनचे प्रातिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये जिल्हास्तरीय निवड झालेल्या विजेत्यांचा सत्कार पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी विविध पथक प्रमुखांनी पालकमंत्री डॉ. खाडे यांना मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलनात सांगली पोलीस दल, आरसीपी पोलीस पथक, सशस्त्र पोलीस पथक, महिला पोलीस पथक, होमगार्ड, वाहतूक विभाग, महाराष्ट्र सुरक्षा बल, अग्निशमन दल, निमणी स्कूल (एमसीसी), मार्टिन इंग्लिश स्कूल व आर. पी. पाटील स्कूल कुपवाड या शाळांचे पथक, पोलीस दल बँड पथक, दंगल ‍विरोधी पथक, श्वान पथक, निर्भया पथक वाहन, डायल 112 वाहन, फॉरेन्सिक लॅब वाहन, बॉम्ब शोधक पथक वाहन, अग्निशमन वाहन आदि पथकांसह पत्रकार ‍दीपक चव्हाण यांचा ‍चित्ररथ आदिंनी सहभाग घेतला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमात ए. ए. उपाध्ये गर्ल्स हायस्कूल कुपवाड, श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूल सांगली, सौ. कस्तुरबेन भगवानदास दामाणी हायस्कूल सांगली, देशभक्त नाथाजी लाड विद्यालय सांगली, रा. ने. पाटील गर्ल्स हायस्कूल सांगली, मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मिरज, ज्युबिली कन्या शाळा मिरजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

        या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन विजयदादा कडणे व बाळासाहेब माळी यांनी केले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!