सांगली येथे मतदान अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणाबाबतचे रॅन्डमायझेशन संपन्न : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूक कार्यक्रमानुसार ४४-सांगली लोकसभा मतदारसंघाकरिता दि. ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने मतदान अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणाबाबतचे रॅन्डमायझेशन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाले.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दुसऱ्या रॅन्डमायझेशनबाबत सांगली व हातकणंगले मतदारसंघातील सर्वसाधारण निरीक्षकांना विस्तृत माहिती दिली. तर जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल यांनी या सरमिसळबाबत सादरीकरण केले.
यावेळी सर्वसाधारण निरीक्षक परमेश्वरम बी. तसेच हातकणंगले मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक संदीप नांदुरी, खर्च निरीक्षक श्रीमती हरीशा वेलेंकी, कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद शर्मा, पोलीस अधीक्षक (सांगली) संदीप घुगे, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, निता शिंदे आदी उपस्थित होते.
दिनांक 25, 26, 27 रोजी पुन्हा एकदा प्रशिक्षण घेण्यात येणार असून सुमारे ११ हजार मतदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.