माहिती व तंत्रज्ञानमहाराष्ट्र

नौदल अधिकाऱ्यांच्या गणवेशावरील नवीन मानचिन्ह शिवाजी महाराजांचा वारसा प्रतिबिंबित करतील : पंतप्रधान नरेंद्र मोदी

मालवण येथे आयोजित नौदल दिन 2023 कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती ;

 

नौदल दिनी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, भारतीय नौदलाच्या ध्वजामध्ये राजमुद्रेचा वापर हे तमाम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद – मुख्यमंत्री

सिंधुदुर्ग :-

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग येथे आयोजित ‘नौदल दिन 2023’ च्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित होते. सिंधुदुर्ग येथील तारकर्ली समुद्रकिनारी भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची ‘थरारक प्रात्यक्षिके ’ यांचे त्यांनी निरीक्षण केले. मोदी यांनीगार्ड ऑफ ऑनर सोहळ्याची पाहणी केली.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, मालवण, तारकर्ली किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग हा भव्य किल्ला , वीर शिवाजी महाराजांचे वैभव आणि राजकोट किल्ल्यावरील त्यांच्या नेत्रदीपक पुतळ्याचे लोकार्पण आणि भारतीय नौदलाचा जयघोष आणि 4 डिसेंबर या ऐतिहासिक दिवसामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाचे मन उत्कटता आणि उत्साहाने भारावून गेले आहे.मोदी यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूरवीरांपुढे नतमस्तक झाले.

सिंधुदुर्गच्या विजयी भूमीवर नौदल दिन साजरा करणे हा खरोखरच अभूतपूर्व अभिमानाचा क्षण आहे असे पंतप्रधान म्हणाले. “सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो” असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा उल्लेख करत सांगितले की कोणत्याही देशासाठी नौदल क्षमतेचे महत्त्व ते जाणून होते. ज्यांचे समुद्रावर नियंत्रण आहे त्यांच्याकडे अंतिम सत्ता आहे या शिवाजी महाराजांच्या घोषणेचा पुनरुच्चार करत पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी शक्तिशाली नौदलाची उभारणी केली. कान्होजी आंग्रे, मायाजी नाईक भाटकर, हिरोजी इंदुलकर या योद्ध्यांपुढे नतमस्तक होत ते आजही प्रेरणास्थान असल्याचे पंतप्रधानानी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने प्रेरित होऊन आजचा भारत गुलामगिरीची मानसिकता झुगारून पुढे मार्गक्रमण करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. नौदल अधिकार्‍यांच्या गणवेशावरील मानचिन्ह (इपॉलेट्स) आता छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि ठेवा अधोरेखित करतील कारण हे नवीन मानचिन्ह नौदलाच्या प्रतीक चिन्हाशी साधर्म्य साधते याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी गेल्या वर्षी नौदलाच्या ध्वजाचे अनावरण केल्याची आठवण सांगितली. आपल्या वारशाचा अभिमान बाळगत पंतप्रधानांनी घोषणा केली की भारतीय नौदल आता भारतीय परंपरेनुसार आपल्या पदांचे (रँक) नामकरण करणार आहे. सशस्त्र दलांमध्ये नारी शक्ती मजबूत करण्यावरही त्यांनी भर दिला. नौदलाच्या जहाजात भारताच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरच्या नियुक्तीबद्दल मोदी यांनी भारतीय नौदलाचे अभिनंदन केले.

140 कोटी भारतीयांचा विश्वास ही सर्वात मोठी शक्ती आहे कारण भारत मोठी उद्दिष्टे निश्चित करत आहे आणि पूर्ण दृढनिश्चयाने ती साध्य करण्यासाठी झटत आहे असे पंतप्रधान म्हणाले. विविध राज्यांतील लोक ‘ राष्ट्र प्रथम’ या भावनेने प्रेरित होत असल्यामुळे संकल्प, भावना आणि आकांक्षा यांच्या एकत्रित सकारात्मक परिणामांची झलक दिसून येत आहे असे पंतप्रधान म्हणाले. “आज देशाने इतिहासातून प्रेरणा घेतली आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार केला जात आहे. नकारात्मकतेच्या राजकारणावर मात करून प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याचा संकल्प जनतेने केला आहे. हा संकल्प आपल्याला विकसित भारताकडे घेऊन जाईल” असे ते म्हणाले.

भारताच्या व्यापक इतिहासाबाबत व्यक्त होताना पंतप्रधान म्हणाले की, हा इतिहास केवळ गुलामगिरी, पराभव आणि निराशेबद्दलचा नसून, त्यामध्ये भारताचे विजय, धैर्य, ज्ञान आणि विज्ञान, कला आणि सृजनशीलता, कौशल्ये आणि भारताच्या सागरी क्षमतांच्या गौरवशाली अध्यायांचाही समावेश आहे. तंत्रज्ञान आणि साधन सामुग्रीची उपलब्धता जवळजवळ नाहीच, अशा काळात उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्गसारख्या किल्ल्याचे उदाहरण देऊन त्यांनी भारताच्या या क्षमतांवर प्रकाश टाकला. त्यांनी गुजरातमधील लोथल येथे सापडलेले सिंधू संस्कृतीमधील बंदर, आणि सुरत येथील 80 पेक्षा जास्त जहाजे नांगरण्याची क्षमता असलेल्या बंदराच्या वारशाचा उल्लेख केला. चोल साम्राज्याने आग्नेय आशियाई देशांपर्यंत आपला व्यापार वाढवला होता, त्याचे श्रेय पंतप्रधानांनी भारताच्या सागरी सामर्थ्याला दिले. परकीय शक्तींच्या आक्रमणामुळे सर्वात प्रथम भारताची सागरी क्षमता बाधित झाल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, जो भारत नौका आणि जहाजे बनवण्यासाठी प्रसिद्ध होता, त्याने समुद्रावरील आपले नियंत्रण गमावले आणि त्यामुळे सामरिक-आर्थिक ताकदही गमावली. भारत विकासाकडे वाटचाल करत असताना, आपण आपले गमावलेले वैभव परत मिळवायला हवे, यावर भर देत पंतप्रधानांनी ब्लू इकॉनॉमी, अर्थात नील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करत असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी ‘सागरमाला’ प्रकल्पाअंतर्गत बंदराच्या माध्यमातून होत असलेल्या विकासाचा उल्लेख केला आणि सांगितले की भारत ‘मेरिटाइम व्हिजन’, अर्थात सागरी दृष्टीकोना अंतर्गत आपल्या महासागरांच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांनी माहिती दिली की सरकारने व्यापारी मालवाहतुकीला चालना देण्यासाठी नवीन नियम बनवले आहेत, त्यामुळे गेल्या 9 वर्षांमध्ये भारतातील सागरी व्यापाऱ्यांची संख्या 140 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. सध्याच्या काळाचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, “हा भारताच्या इतिहासाचा असा काळ आहे, जो केवळ 5-10 वर्षांचा नव्हे, तर येणाऱ्या अनेक शतकांचे भविष्य लिहिणार आहे.” ते म्हणाले की गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये दहाव्या स्थानावरून झेप घेत, तो पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे, आणि तिसर्‍या स्थानाच्या दिशेने वेगाने प्रवास करत आहे. “जग भारताचा ‘विश्व मित्र (जगाचा मित्र)’ म्हणून उदय होताना पाहत आहे,” असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, इंडिया मिडल ईस्ट युरोपियन कॉरिडॉर सारख्या उपायांमुळे हरवलेला मसाल्याचा मार्ग पुन्हा निर्माण होईल. त्यांनी मेड इन इंडियाचे सामर्थ्य स्पष्ट करताना, तेजस, किसान ड्रोन, यूपीआय प्रणाली आणि चांद्रयान-3 यांचा उल्लेख केला.

परिवहन विमाने, विमानवाहू जहाज INS विक्रांतच्या उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता देखील दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

देशाच्या किनारपट्टी आणि सीमावर्ती भागातील गावांना, देशातील शेवटचे गाव, असे संबोधण्या ऐवजी, ‘देशातील पहिले गाव’ समजण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करताना मोदी म्हणाले, “आज, किनारपट्टी भागातील प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान सुधारणे ही केंद्र सरकारची प्राथमिकता आहे.” 2019 मध्ये स्वतंत्र मत्स्यव्यवसाय मंत्रालयाची निर्मिती आणि या क्षेत्रात 40 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा उल्लेख करून, 2014 नंतर मत्स्य उत्पादनात 8 टक्के आणि निर्यातीत 110 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्याशिवाय, शेतकऱ्यांसाठी विमा संरक्षण 2 लाखावरून वरून 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आले असून त्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळत आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील मूल्य साखळीच्या विकासाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की सागरमाला योजना किनारपट्टी भागातील आधुनिक कनेक्टिव्हिटी (संपर्क यंत्रणा) मजबूत करत आहे. यावर लाखो कोटी रुपये खर्च होत असून त्यामुळे किनारपट्टी भागात नवे व्यापार आणि उद्योग सुरु होतील. मत्स्य प्रक्रियेशी संबंधित उद्योग आणि मासेमारी नौकांचे आधुनिकीकरणही हाती घेतले जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

“कोकण हा अभूतपूर्व संधींचा प्रदेश आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. या राज्याच्या विकासासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित करताना पंतप्रधानांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अलिबाग, परभणी आणि धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन, चिपी विमानतळाचे कार्यान्वयन आणि माणगावपर्यंत जोडणाऱ्या दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा उल्लेख केला.काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष योजना तयार केल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. समुद्रकिनारी असलेल्या निवासी भागांचे रक्षण करणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रयत्नात त्यांनी खारफुटीची व्याप्ती वाढविण्यावर भर दिला जात असल्याचा उल्लेख केला. खारफुटी व्यवस्थापनासाठी मालवण, आचरा-रत्नागिरी आणि देवगड-विजयदुर्गसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांची निवड करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

“वारसा आणि विकास, हाच आपला विकसित भारताचा मार्ग आहे,” असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की, कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात या वास्तूंच्या संवर्धनावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना छत्रपती वीर शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेले गड-किल्ले जतन करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा निर्धार आहे. यामुळे या भागातील पर्यटन वाढून नवीन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

संबोधनाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी दिल्लीबाहेर लष्कर दिन, नौदल दिन इत्यादीसारखे सशस्त्र सेना दिन आयोजित करण्याच्या नवीन परंपरेबद्दल सांगितले कारण यामुळे या सोहोळ्याची व्याप्ती भारतभर वाढते आणि नवीन ठिकाणे आकर्षणाचे नवीन केंद्र ठरतात.

नौदल दिनी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, भारतीय नौदलाच्या ध्वजामध्ये राजमुद्रेचा वापर हे तमाम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ही बाब आपल्या सर्वांच्या गौरवाची आहे. भारतीय नौदलाच्या ध्वजामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रेचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले व तमाम महाराष्ट्रासाठी गौरवाची अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. शिवपराक्रमाने पावन झालेल्या शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले.

आज संपूर्ण महाराष्ट्रच नाहीतर राष्ट्र शिवाजी महाराजांना अभिवादन करत आहे. या ऐतिहासिक पूर्वसंध्येला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. यावेळी महाराष्ट्राची पहिली नौदल अधिकारी म्हणून श्रीमती देवस्थळी यांची नेमणूक झाली आहे याचाही तमाम महाराष्ट्राला अभिमान असल्याचे सांगून ते म्हणाले देशातील महिलांच्या आत्मनिर्भरतेच प्रतीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालं आहे. आत्मनिर्भरतेचा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा आणि वसा आपण सर्वजण पुढे घेऊन जात आहे. आत्मनिर्भर भारत आणि आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास आलाय. आता आपल्या सामर्थ्याची नोंद संपूर्ण जगाने घेतलेली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. सिंधुदुर्ग येथील ‘नौदल दिन 2023’ सोहोळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी वारशाला आदरांजली अर्पण करतो, ज्यांच्या राजमुद्रेद्वारे नवीन नौदल चिन्हाची प्रेरणा मिळाली; ज्याचा स्वीकार गत वर्षी पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतच्या जलावतरणावेळी करण्यात आला.

दरवर्षी, नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दले यांच्याद्वारे ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ आयोजित करण्याची परंपरा आहे. ही ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ लोकांना भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या बहु-डोमेन कार्यान्वयनाच्या विविध पैलूंचे साक्षीदार बनण्याची संधी देतात. असे राष्ट्रीय सुरक्षेतील नौदलाच्या योगदानावर प्रकाश टाकतात आणि नागरिकांमध्ये सागर विषयक जाणीव-जागृती करतात.

पंतप्रधानांनी अनुभवलेल्या क्रियात्मक प्रात्यक्षिकांमध्ये कॉम्बॅट फ्री फॉल, हाय स्पीड रन्स, स्लिदरिंग ऑप्स ऑन जेमिनी अँड बीच असॉल्ट, एसएआर डेमो, व्हीईआरटीआरईपी आणि एसएसएम लाँच डिल, सीकिंग ऑप्स, डंक डेमो आणि सबमरीन ट्रान्झिट, कामोव्ह ऑप्स, न्यूट्रलायझिंग एनिमी पोस्ट, स्मॉल टीम इन्सर्शन – एक्स्ट्रॅक्शन (एसटीआयई ऑप्स), फ्लाय पास्ट, नेव्हल सेंट्रल बँड डिस्प्ले, कंटिन्युटी ड्रिल, हॉम्पाइप डान्स, लाइट टॅटू ड्रमर्स कॉल आणि सेरेमोनिअल सनसेट यांचा समावेश होता. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!