आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

रायगड जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध : मंत्री प्रकाश आबिटकर

रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सात मजली 300 खाटांच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न

 

 

  दर्रापण न्यूज रायगड :- रायगड जिल्ह्यातील य नागरिकांना वेळेत उपचार व उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सात मजली 300 खाटांच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उद्योग मंत्री उदय सामंत, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते झाले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, आरोग्य विभागाचे उपसंचालक अशोक नांदापुरकर, जिल्हा शल्य चिकत्सक रायगड डॉ.निशिकांत पाटील, डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे यांसह विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री.आबिटकर म्हणाले जिल्ह्यातील आरोग्य विषयक सेवा बळकट करण्यावर प्राधान्याने लक्ष देण्यात येईल.गामीण भागातील जनतेसाठी जिल्हा रुग्णालय हे अत्यंत महत्वाचे आरोग्य केंद्र आहे. या माध्यमातून नागरिकांना अत्याधुनिक सेवा पुरविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाने आरोग्य सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतलेला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी राज्यात सुरु आहॆ. राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही श्री.आबिटकर यांनी यावेळी सांगितले. जिल्हा रुग्णालयाची इमारत उत्कृष्ट आणि दर्जेदार होण्यासाठी यंत्रणानी दक्ष रहावे. या इमारतीच्या बांधकामात कुठल्याही प्रकारची तडजोड स्विकारली जाणार नाही अशा सूचनाही श्री.बिटकर यांनी दिल्या.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रायगड जिल्ह्याची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होत असल्याने ही अतिशय आनंदाची बाब आहे. तत्कालीन पालकमंत्री या नात्याने या कामाची मंजुरी आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे समाधान असल्याचे सांगितले. या रुग्णालयाचे बांधकाम विहित मुदतीत पूर्ण करावे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आ.महेंद्र दळवी यांना सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी रायगड हा ऐतिहासिक जिल्हा आहे. या जिल्ह्यातील आरोग्य सेवा उत्कृष्ट व दर्जेदार करण्यासाठी सर्व लोक प्रतिनिधी सामूहिक प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांना जिल्ह्यातच सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

आ.महेंद्र दळवी यांनी जिल्हा रुग्णालयासाठी नवीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्यसरकारच्या उच्चाधिकार समितीने एकूण साडे चारशे कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 2 लाख चौरस फुटाची सात मजल्यांची सुसज्ज इमारत बांधली जाणार असून 300 खाटांच्या या नवीन इमारती साठी पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील यांनी प्रास्तविक केले. या इमारतीत 20 खाटांचा अतिदक्षता विभाग, 16 खाटांचे नवजात बालक उपचार कक्ष आणि 20 खाटांचे डायलेसिस युनीटचा समावेश असणार आहे. अपघात विभागसाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्षाही उभारला जाणार आहे. तसेच इमारतीत पाच अत्याधुनिक यंत्र सामुग्रीसह शस्त्रक्रिया कक्ष ही बांधले जाणार आहेत. एचआयव्ही, एचएसबी बधितासाठीही वेगळे शस्त्रक्रिया कक्ष असणार आहे. याशिवाय लॉड्री, पाककक्ष, क्ष किरण कक्ष, चार लिफ्ट, दोन जिने एक रॅम्प अशी सुविधा इमारतीमध्ये असणार आहे असेही डॉ पाटील यांनी सांगितले.
आभार प्रदर्शन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ शीतल जोशी घुगे यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी, आरोग्य सेवक, परिचारिका उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!