आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

सामाजिक न्याय विभागाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी ;   जिल्हाधिकारी अशोक काकडे

 

      दर्पण न्यूज सांगली : सामाजिक न्याय विभागाच्या योजना या बहुजनांच्या कल्याणार्थ आहेत. शिक्षण, निवास, शिष्यवृत्ती अशा अनेक योजनांतून मागासवर्गियांच्या विकासास मदत होते. त्यामुळे या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून बहुजनांचे सबळीकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिले.

            सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते आदिंसह सामाजिक न्याय विभागाच्या विविध समित्यांचे शासकीय, अशासकीय सदस्य उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सन 2024-25 या अमृत महोत्सवी वर्षात घर घर संविधान हा उपक्रम साजरा केला जात आहे. या उपक्रमांतर्गत संविधानाची जागरूकता वाढवावी. संविधानाची प्रत प्रत्येक घरी वितरीत कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

            जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळा, आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य आदि सोयी सुविधांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याची खात्री करावी. शासकीय निवासी शाळांचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट करून घ्यावे. इमारतीमध्ये काही दुरूस्ती करावयाची असल्यास त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेळीच करावी. वसतिगृह निरीक्षण समितीने वेळोवेळी जिल्ह्यातील वसतिगृहांना भेटी द्याव्यात. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करावी. निवासी शाळा, आश्रमशाळांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत यासाठी त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची जनजागृती करावी. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे विविध आर्थिक लाभ डीबीटीव्दारेच होत असल्याची तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी  दिल्या.

            यावेळी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्व असलेल्या स्थळांचा विकास करणे अंतर्गत जिल्ह्यातील बांधकाम केलेल्या स्मारकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये मौजे आरग येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनमित्त घटनास्थळ, मौजे अंकलखोप येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तसेच मौजे वाटेगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक आदींचे बांधकाम व सद्यस्थिती यांचा आढावा घेण्यात आला.

            तृतीयपंथीयांचे मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सूचित करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, तृतीयपंथीयांना शिधापत्रिका, ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच त्यांच्या समस्यांचे, तक्रारींचे तातडीने निवारण करावे.

            कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जिल्ह्यात सन 2004-05 पासून आत्तापर्यंत एकूण 63 लाभार्थ्यांना 154 एकर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये 98 एकर बागायत व 56 एकर जिरायत जमिनीचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

            यावेळी घर घर संविधान उपक्रमांतर्गत संविधान समिती आढावा बैठक, जिल्हास्तरीय वसतिगृह निरीक्षण समिती बैठक, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्व असलेल्या स्थळांचा विकास करणे अंतर्गत जिल्ह्यातील बांधकाम केलेल्या स्मारकांची सद्यस्थितीबाबत आढावा बैठक, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या / तक्रारी संदर्भात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक घेण्यात आली. तसेच, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत लॉटरी पध्दतीने प्रातिनिधीक लाभार्थीची निवड जिल्हाधिकारी अशोक काकडे व बालक यांच्याहस्ते चिठ्ठी उचलून करण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!