ताज्या घडामोडी

रेल्वे विभागाशी संबंधित सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करा : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली : सांगली मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल मार्ग तसेच रेल्वे विभागांशी संबंधित अन्य सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करा. त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सविस्तर आराखडा सादर करावा, असे निर्देश कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबतच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार रेल्वेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी आज सांगलीला भेट देऊन पाहणी केली व समस्यांची माहिती घेतली. त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, रेल्वे विभागाचे सिनियर सेक्शन इंजिनिअर प्रीतमकुमार आणि मंडल रेल इंजिनिअर विकासकुमार आदि उपस्थित होते.

सांगली मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील जुना पूल तसाच ठेवून नवीन सहा पदरी पूल करण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री यांच्या सूचनेनुसार रेल्वे प्रशासनाने स्थानिकांच्या समस्यांकडे सकारात्मक विचारसरणीने पाहावे. सांगली मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील जुना पूलासंदर्भात नागरिकांची सोय पाहावी. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका आदि संबंधित विभागांच्या स्थानिक अधिकाऱ्याशी समन्वय ठेवून यासंदर्भातील कार्यवाही करावी. कृपामयी रेल्वे ओव्हरब्रीज, मिरज यार्ड येथील रेल्वे फाटक क्र. १ आणि मिरज आरग सेक्शनमधील रेल्वे फाटक क्र. ७० आणि हुबळी विभागातील विजयनगर स्टेशन यार्ड या ठिकाणी प्रवाशी व नागरिकांच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सर्वोच्च प्राधान्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. समतानगर (मिरज) येथील रेल्वेच्या भिंतीमुळे नागरिकांना वहिवाटीसाठी कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता रेल्वे व महानगरपालिका यांनी घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!