महाराष्ट्र

संभाव्य पूर, आपत्ती हाताळण्यास प्रशासन सज्ज; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली : जिल्ह्यात पाऊस सुरू असून सद्यस्थितीत पूर व आपत्तीजनक, धोकादायक परिस्थिती नाही. संभाव्य आपत्ती परिस्थिती हाताळण्यासाठी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस, पाटबंधारे, सर्व  प्रशासन व इतर सर्व विभाग सतर्क व सज्ज आहेत. यामुळे नागरिकांनी काळजी करू नये. कोणतीही अडचण आल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून मदत घ्यावी. कोणत्याही अनधिकृत माहिती  किंवा अफवांवर  विश्वास ठेवू नये. शासन व स्थानिक प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

जिल्ह्यात येणाऱ्या काळात संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनामार्फत निश्चित केलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रात, किंवा सुरक्षित ठिकाणी नागरिकांनी स्थलांतरित व्हावे. ही निवारा केंद्र कोठे आहेत याची माहिती नागरिकांनी जाणून घ्यावी. त्याचबरोबर नियमितपणे प्रशासनाच्या संपर्कात रहावे. सांगली जिल्ह्यामध्ये चार गावातील दरड प्रवण भागाची जिल्हा प्रशासनामार्फत नुकतीच पाहणी करण्यात आली असून तेथे एनडीआरएफमार्फत गावकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या कोणताही धोका दिसत नसून जर स्थलांतराची गरज पडल्यास त्यांना प्रशासनामार्फत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले जाईल. सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. पाणी उकळून प्यावे. जिल्ह्यामध्ये एनडीआरएफचे एक पथक पोहोचले असून त्यांनी पूरपरिस्थितीच्या ठिकाणांची पाहणी केली आहे. स्थानिक लोकांचेही सहकार्य असून आपदा मित्रांचेही प्रशिक्षण झाले आहे. सर्व नागरिकांनी सतर्क रहावे, सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!