आपत्तीत वापरायची साधनसामग्री सुस्थितीत ठेवा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या यंत्रणांना सूचना

सांगली :- पुरामध्ये मदत व बचाव कार्यासाठी लागणाऱ्या यांत्रिकी बोटी, लाईफ जॅकेट, रिंग यासह आपत्तीमध्ये आवश्यक साधन सामग्री सुस्थितीत ठेवण्याबरोबरच या साधन सामग्रीची वेळीच देखभाल दुरुस्तीही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून तयारी आढावा बैठक झाली. बैठकीस महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, आपत्ती काळातील कामे होण्यासाठी जलद गतीने व प्रभावी होण्यासाठी अवश्यक मनुष्यबळाचे आदेश निर्गमित करावेत. संभाव्य पुरामुळे बाधित होणाऱ्या होणाऱ्या गावात ग्रामस्तरावरील यंत्रणेच्या बैठका घ्याव्यात. संभाव्य पुरामुळे बाधित लोकांचे स्थलांतर करावयाचे झाल्यास स्थलांतराच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. निवारा केंद्रांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करावा.
साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने धूर फवारणीसह आवश्यक औषध साठा उपलब्ध करून ठेवावा. अत्यावश्यक औषधे प्रत्येक आरोग्य केंद्रात उपलब्ध राहतील याची काळजी घ्यावी, अशा सूचना करून आपत्तीमध्ये सर्व संबधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.