दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील -:
गोकुळ दूध संघाच्या बहुचर्चित पंचवार्षिक निवडणुकीचा तिढा अद्याप कायम असून विविध न्यायालयांतील सुनावण्यांमुळे निवडणूक प्रक्रियेबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे. सदस्यत्व, अवसायनातील संस्था आणि निवडणुकीस मुदतवाढ यासंदर्भातील तीन महत्त्वाच्या प्रकरणांवर पुढील काही दिवसांत सुनावण्या होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष न्यायालयीन घडामोडींवर लागले आहे.
गोकुळच्या 410 संस्थांच्या सदस्यत्वाबाबतच्या प्रकरणाची सहकार न्यायालयात 10 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत न्यायालय कोणती भूमिका घेते, यावर पुढील निवडणूक प्रक्रियेची दिशा अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, अवसायनातील संस्थांवरील संभाव्य कारवाईसंदर्भात सर्किट बेंचमध्ये आव्हान देण्यात आलेल्या 194 संस्थांच्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून आता न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे. या निर्णयाचाही निवडणुकीच्या समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, सहकार विभागाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या निवडणूक मुदतवाढीच्या याचिकेवरही पुढील दोन दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे.
या तिन्ही प्रकरणांमुळे गोकुळच्या निवडणूक कार्यक्रमाबाबत अद्याप अनिश्चिततेचे वातावरण कायम असून, न्यायालयीन निर्णयानंतरच निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार असल्याची चर्चा सहकार आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे.
