- विविध केंद्रांना भेटी देत कामकाजाची पाहणी; अधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
दर्पण न्यूज अमरावती : पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी नुकताच अमरावती विभागाचा दोन दिवसीय दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विभागातील विविध शासकीय संस्था, प्रक्षेत्रे व खाजगी प्रकल्पांना भेटी देऊन कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. आयुक्तांच्या या भेटींमुळे अमरावती विभागातील पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला.
दौऱ्याच्या सुरुवातीला आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी नांदगाव पेठ येथील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ ला भेट दिली. त्यांनी दवाखान्याची इमारत, उपचार व्यवस्था, शस्त्रक्रिया कक्ष, प्रशासकीय कामकाज, स्वच्छता व पशुरुग्णांना मिळणाऱ्या सेवांची बारकाईने पाहणी केली. दवाखान्यातील उत्कृष्ट स्वच्छता, शिस्तबद्ध प्रशासन आणि दर्जेदार रुग्णसेवा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले व डॉ. देवराव हटकर यांच्या कामाचे कौतुक केले. यानंतर त्यांनी तिवसा येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली.
महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या पोहरा येथील ‘गवळाऊ बोव्हाईन ब्रिडींग फार्म’ला भेट देऊन आयुक्तांनी तिथे वृक्षारोपण केले व अधिकाऱ्यांमध्ये शासनाच्या वसुंधरा अभियानाचा जागर केला. प्रक्षेत्रावरील गवळाऊ गोवंशाच्या चांगल्या व्यवस्थापनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या पोहरा प्रक्षेत्राला भेट देऊन तेथील प्रशिक्षण कार्य व चारा व्यवस्थापन पद्धतीचा विशेष आढावा घेतला.
आयुक्तांनी एनएलएम (राष्ट्री पशुधन अभियान) प्रोजेक्ट अंतर्गत अमरावती येथील शक्ती दिक्षित या लाभार्थ्याच्या वराह पालन केंद्राला, तसेच अंजनगाव बारी येथील प्रगतीशील कुक्कुटपालन व्यावसायिक रवींद्र मेटकर यांच्या आधुनिक पोल्ट्री फार्मला भेट देऊन त्यांच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले. याशिवाय नांदुरा येथील गोकुलम गोरक्षण गोशाळा, मणिकर्णिका गोशाळा (बेलोरा लोणी) व श्री गोरक्षण गोशाळेला भेट देऊन तिथल्या पशुधनाच्या संगोपनाची पाहणी केली.
दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय, तसेच जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालयांना भेटी देऊन प्रशासकीय कामकाजाचा सखोल आढावा घेतला व भविष्यातील कामांबाबत मार्गदर्शन केले. या संपूर्ण दौऱ्यादरम्यान प्रादेशिक सहआयुक्त डॉ. येसुदेव वंजारी, जिल्हा उपायुक्त डॉ.
संजय कवरे, सहाय्यक आयुक्त डॉ. पुरुषोत्तम सोळंके, डॉ. तुषार गावंडे यांच्यासह विभागातील विविध पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.