दर्पण न्यूज मिरज/सांगली : मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्यंत अत्याधुनिक अशा 25 बेड मेडिसीन मॉड्युलर आयसीयू विभाग कार्यरत आहे. या सुविधेमुळे आता गरीब आणि गरजू रुग्णांना खाजगी कॉर्पोरेट हॉस्पिटल्ससारख्या महागड्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या असून, रुग्णालयाच्या मॉड्युलर आयसीयू मध्ये मार्च 2025 पासून जून 2026 पर्यंत 8200 गंभीर रुग्णांवर प्रभावी आणि सुरक्षित उपचार करण्यात आले.
मॉड्युलर आयसीयू मुळे संसर्गाचा (Infection) धोका शून्य टक्के, या आयसीयूमध्ये विशेष अॅंटी-बॅक्टेरियल’ (जीवाणूरोधक) भिंती आणि फ्लोअरिंगचा वापर करण्यात आला आहे. तसेच हवेतील जंतू रोखण्यासाठी HEPA फिल्टर्स आणि अत्याधुनिक व्हेंटिलेशन सिस्टम बसवण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना रुग्णालयातील अंतर्गत संसर्ग होण्याचा धोका कमी आहे. अत्याधुनिक जीवरक्षक प्रणाली हे प्रत्येक बेडसोबत मल्टिपॅरा मॉनिटर्स, प्रगत व्हेंटिलेटर्स, अत्याधुनिक इन्फ्युजन पंप्स आणि सेंट्रलाइज्ड ऑक्सिजन पुरवठा जोडण्यात आला आहे. यामुळे रुग्णाच्या प्रकृतीवर अचूक लक्ष ठेऊन उपचार केले जातात. २४ तास अखंडित वीज आणि वैद्यकीय ऑक्सिजन या युनिटला बॅकअपसह अखंडित वीजपुरवठा आणि मध्यवर्ती वैद्यकीय गॅस पाईपलाईन जोडलेली आहे, ज्यामुळे उपचारात कोणताही खंड पडत नाही. मॉड्युलर रचनेमुळे प्रत्येक बेडमध्ये आवश्यक अंतर आणि पडद्यांची व्यवस्था आहे, ज्यामुळे रुग्णाची गोपनीयता (Privacy) राखली जाते.
खाजगी रुग्णालयांमध्ये आयसीयूचा एका दिवसाचा खर्च हजारो रुपयांच्या घरात असतो, जो सर्वसामान्य रुग्णांना परवडणारा नसतो. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ही सेवा सुरू झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र (सांगली, कोल्हापूर, सोलापूर) आणि सीमाभागातील (कर्नाटक) गरीब रुग्णांना याचा थेट फायदा होत आहे. अपघातग्रस्त, हृदयविकाराचे झटके आलेले, गंभीर शस्त्रक्रिया झालेले रुग्ण, मेंदूचे आजारांचे रुग्ण (Stroke, Brain Hemorrhage, शस्रक्रिया नंतर, Coma), Sepsis, मूत्रपिंड आजारचे रुग्ण, Diabetic Ketoacidosis. विषबाधा, Drug Overdose, सर्पदंश झालेले रुग्ण, गंभीर श्वसनाचे आजार असलेले रुग्ण, अस्थमा, न्यूमोनिया किंवा COPD सारख्या फुफ्फुसांच्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवरती मॉड्युलर आयसीयू मुळे उपचार करणे जलद व सोयीस्कर झाले आहे. आता तातडीने आणि दर्जेदार अतिदक्षता उपचार मिळत आहेत. त्यामुळे अतिजोखमीच्या आणि गंभीर रुग्णांचे प्राण वाचवण्यात हे आयसीयू मोलाची भूमिका बजावत आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री हसन मुश्रीफ यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे ५० बेडचे मॉड्युलर आयसीयु हे राज्यशासन योजनेतून मंजूर व तयार करून दिले आहे. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्यात आला.
याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव म्हणाले, मिरज सिव्हिल मॉड्युलर आयसीयू अतिदक्षतेची गरज असलेल्या कोणत्याही गंभीर रुग्णाला तात्काळ आणि अद्ययावत वैद्यकीय सेवा देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज २४ तास सज्ज आहे. आयसीयू हे केवळ सांगली जिल्ह्यासाठीच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील गरीब रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रूपेशकुमार शिंदे म्हणाले, मिरज शासकीय रुग्णालय हे नेहमीच रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर राहिले आहे. या नव्या मॉड्युलर आयसीयूमुळे गंभीर रुग्णांचे प्राण वाचवण्यास मोठी मदत होत आहे आणि इन्फेक्शनचे प्रमाण खूप कमी झाले आहे. सर्वसामान्यांना सर्वोत्तम आरोग्य सेवा देणे हेच आमचे ध्येय आहे.