दर्पण न्यूज सांगली : सांगली जिल्हा कारागृहात बंद्यांना समुपदेशन होऊन समाजात गुन्हेगारी कमी होण्याच्या उद्देशाने कीर्तन सोहळा घेण्यात आल्याची माहिती सांगली जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विजय कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रसंगी सांगली जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विजय कांबळे, तुरुंगाधिकारी श्रेणी-2 दत्तात्रय सरडे, सुभेदार जयवंत शिंदे, श्री. गिते गुरुजी व कर्मचारी तसेच जीवन विद्या मिशनचे पदाधिकारी अतुल हंगे व सी. बी. होमराव उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कारागृह व सुधारसेवा चे पोलीस महानिरीक्षक तथा अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई व पश्चिम विभाग येरवडा पुणे चे कारागृह उपमहानिरीक्षक सुनिल ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कारागृहातील बंदींकरिता विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून बंद्यांना समुपदेशन होऊन समाजात गुन्हेगारी कमी होण्याच्या उद्देशाने मामासाहेब दांडेकर सेवा संघ आळंदी (देवाची) द्वारा संचलित वारकरी आचारसंहिता परिषद, महाराष्ट्र यांच्यामार्फत कीर्तनकार निलेश महाराज झरेगांवकर यांनी आषाढी वारीनिमित्त सोमवार दिनांक 06 जुलै 2026 रोजी सांगली जिल्हा कारागृह येथे कीर्तन सांगितले.