दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
पुणे पदवीधर मतदार संघाच्या पुरवणी मतदार यादीसाठी ३१ मे २०२६ अखेरपर्यंत केवळ ४५५ पात्र पदवीधरांनी मतदार नोंदणी केली असून, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्हा पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यात ३७४८, सातारा १८३७, सोलापूर १४५० तर सांगली जिल्ह्यात ६१० मतदारांची नोंदणी झाली आहे.
मुख्य मतदार यादी १२ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मतदार संख्या १४४०० असून, सांगली ७८३६६, पुणे ६९१११, सातारा ४२०६३ आणि सोलापूर ३७५७० इतकी आहे.
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक नोव्हेंबर २०२६ मध्ये अपेक्षित असून, निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम ऑगस्टमध्ये जाहीर होणार आहे. तोपर्यंत पात्र पदवीधरांना मतदार नोंदणी करता येणार असल्याचे सांगण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्याने पदवीधर मतदार नोंदणीत आपले प्रथम स्थान कायम राखण्यासाठी मोठ्या संख्येने पात्र पदवीधरांनी नोंदणी करावी, असे आवाहन ‘पदवीधर मित्र’ संस्थेचे अध्यक्ष माणिक पाटील-चुयेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.