दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
धाराशीव जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर आणि मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज, दिनांक ०४ जून २०२६ रोजी तुळजापूर येथे अवैधरित्या चालणाऱ्या २ मटका अड्ड्यांवर, २ अवैध ताडी विक्री केंद्रांवर आणि १ कोपटा (COTPA) कायद्यांतर्गत अशा एकूण ५ ठिकाणी एकाच वेळी धडक छापेमारी करण्यात आली.गोपनीय माहितीच्या आधारे धाड परि.पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे ही योजनाबद्ध कारवाई करण्यात आली. या मोहिमेत श्री. अमोल मोहिते यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक श्री.सुरेश कासुळे , सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रविण सोमवंशी, पोलीस उपनिरीक्षक (PSI) श्री. रामचंद्र बहुरे, तसेच क्युआरटी (QRT) पथक, आरसीपी (RCP) पथकातील पोलीस अंमलदार आणि चालकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
*१४ संशयित ताब्यात; ५ गुन्हे दाखल
या धडक कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण १४ संशयितांना रंगेहात ताब्यात घेतले आहे, तर २ संशयित आरोपी फरार झाले आहेत. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधित इसमांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ चे कलम १२ (अ) आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, कलम ६५-इ व ८४ तसेच कोपटा (COTPA) ॲक्टनुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेली एकूण अंदाजे १३० लीटर अवैध ताडी पोलिसांनी नष्ट केली आहे. फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
धाराशिव जिल्ह्यात कोणत्याही प्रकाराचे अवैध धंदे, जुगार किंवा अवैध दारू-ताडी विक्री खपवून घेतली जाणार नाही. जिल्ह्यात कुठेही अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध यापुढेही अशीच अत्यंत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.