महाराष्ट्रसामाजिक

सुरळीत पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते व स्वच्छतेला प्राधान्य द्या :पालकमंत्री प्रकाश आबिटकर

 

कोल्हापूर -: दिवाळी सण लवकरच येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सुरळीत पाणीपुरवठा आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. तसेच, शहरातील नागरिक आणि धार्मिक तसेच पर्यटनाच्या अनुषंगाने येणाऱ्या पर्यटकांसाठी महानगरपालिकेने दर्जेदार रस्ते तयार करावेत, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री. आबिटकर म्हणाले, शहरात जास्त वाहतूक असणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देऊन ते दुरुस्त करावेत. त्याचबरोबर, शंभर कोटी निधीच्या माध्यमातून रस्त्यांची होणारी कामे गुणवत्तापूर्ण करावीत. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन योग्य रीतीने करावे. हे करताना अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी अचानक भेटी कराव्यात. या कामांमध्ये जबाबदार अधिकाऱ्यांनी कसूर करू नये. शहरातील ४० हजार प्रॉपर्टी कार्ड धारकांच्या मोजणीच्या अनुषंगाने डीपीडीसीमधून ९४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. ब्ल्यू लाइनबाहेरील जागेत रिंग रोड व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करू. येत्या काही महिन्यांत कोल्हापूरच्या विकासाचे एक नवीन मॉडेल निश्चितपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेला रिंग रोडचा विषय महानगरपालिकेने तातडीने हाती घ्यावा. टीडीआरचे धोरण जाहीर करावे. महानगरपालिकेतील रिक्त पदांची भरती करावी आणि उत्पन्नाचे स्रोत वाढवावेत, असे श्री. क्षीरसागर यांनी सुचवले. तसेच, शहरातील महानगरपालिकेच्या खुल्या जागांसंदर्भात वृत्तपत्रीय नोटीस द्यावी. आमदार फंडातूनही रस्ते दर्जेदार करावेत. भविष्यात शहराची होणारी हद्दवाढ लक्षात घेऊन महानगरपालिकेने आतापासून नियोजन करावे, असे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.

विकास हस्तांतरणीय हक्क (ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राइट्स – टीडीआर) मोजणी अहवालावर जिल्हा प्रशासनाच्यावतीने तात्काळ कार्यवाही करून एनओसी तयार ठेवण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, टीडीआरच्या अनुषंगाने स्टेज वन आणि स्टेज टू संदर्भात लवकरच एसओपी (SOP) तयार करण्यात येईल. या बैठकीत पालकमंत्री आबिटकर यांनी शहरातील रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, रेखांकन, रिंग रोड, सिटी डेव्हलपमेंट, पार्किंग, अतिक्रमण, पाणीपुरवठा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपायुक्त शिल्पा दरेकर, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक शिवाजीराव भोसले, नगररचना सहायक संचालक विनय झगडे यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.

०००००००

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!