सांगली; मुलां-मुलींच्या शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

सांगली : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांमार्फत कार्यरत तासगाव तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा कवठेएकंद व पलूस तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा बांबवडे येथे सन 2024-25 करिता इयत्ता 6 वी ते 10 वी सेमी इंग्रजी माध्यम या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा, असे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
प्रवेश अर्ज संबंधित शासकीय निवासी शाळा व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय सांगली येथे उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी प्रवर्गनिहाय जागा आरक्षित व मर्यादित असून अनुसूचित जाती व नवबौध्द 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, विजाभज 5 टक्के, दिव्यांग 3 टक्के, एस.बी.सी. 2 टक्के याप्रमाणे शासकीय निवासी शाळेत प्रवेश निश्चित केला जातो.
शासकीय निवासी शाळांमध्ये कोणतीही फी न घेता मोफत प्रवेश दिला जातो. निवासी शाळेत निवास, निवास साहित्य, भोजन, दैनंदिन वापराचे साहित्य, पाठ्यपुस्तके, वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व गणवेश अशा प्रकारच्या सुविधा मोफत दिल्या जातात. विद्याथी, विद्यार्थीनींच्या सर्वांगीण विकासाकरीता सुसज्ज अद्यावत वर्ग खोल्या, ग्रंथालय, व्यायामशाळा, ई-लर्निंग, मनोरंजन कक्ष इत्यादी सोयीसुविधेसह विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.