केंद्रीय संचार ब्युरो आणि कोकण रेल्वे यांच्या वतीने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आयोजित सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित मल्टीमीडिया प्रदर्शनाची दिमाखात सांगता

रत्नागिरी :-
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर आणि कोकण रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे आयोजित सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांच्या विभागस्तरीय प्रदर्शनाची आज सांगता झाली.
हे प्रदर्शन 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत संपन्न झाले.
या वेळी शाहीर सुरेश पाटील आणि त्यांच्या कलापथकाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी कोकण रेल्वेच्या प्रवाशांनी तसेच शहरातील नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि सरदार पटेल यांच्या जीवनाविषयी जाणून घेतले. 30 ऑक्टोबर रोजी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले होते. 31 ऑक्टोबर हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असल्याने राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो, याचे औचित्य साधून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
देशाच्या एकीकरणाचे शिल्पकार असलेल्या सरदार पटेल यांच्या जीवनाची सर्वसामान्यांना दुर्मिळ छायाचित्रांच्या माध्यमातून माहिती घेता यावी हा यामागचा उद्देश होता.
यावेळी आयोजित प्रश्नमंजुषेमध्ये रेल्वे प्रवाशांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग तसेच जिल्हा निवडणूक कार्यालय यांच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉल्सना देखील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरील माहिती मल्टीमीडिया माध्यमातून प्रदर्शनात देण्यात आली. भव्य कट आउट, सेल्फी बूथ, व्ह्वर्चुअल रियालिटी गॉगल्स, 360 डिग्री सेल्फी बूथ प्रवाशांसाठी आकर्षणाचा विषय ठरले.
केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक कार्यालय पुणे यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कोल्हापूर सांगली आणि रत्नागिरी असे कार्यक्षेत्र असलेल्या केंद्रीय संचार ब्युरो, कोल्हापूर मार्फत आयोजित या प्रदर्शनाला प्रतिदिन 6500 हजारापेक्षा जास्त लोकांनी भेट दिली.