महाराष्ट्र

भिलवडी येथील प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे यांना “यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर

 

*भिलवडी प्रतिनिधी-:
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमार्फत महाविद्यालयीन स्तरावर उल्लेखनीय व आदर्श कार्य करणाऱ्या शिक्षकांना “यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार” देण्यात येतो. आधुनिक महाराष्ट्राच्या कृषी-औद्योगिक जडणघडणीचे शिल्पकार, एक सुसंस्कृत राजकारणी, शिक्षण-साहित्य कला-क्रीडा-संस्कृती, सहकार यांमधील एक जाणते नेतृत्व असलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरतो. रयत शिक्षण संस्थेमार्फत यावर्षीचा हा पुरस्कार सांगली जिल्ह्यातील भिलवडी या गावचे सुपुत्र प्रो. (डॉ.) अनिलकुमार कृष्णराव वावरे यांना नुकताच जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण मंगळवार दिनांक ९ मे २०२३ रोजी सातारा येथील कर्मवीर समाधी परिसर येथे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते होणार आहे. प्रो. (डॉ.) अनिलकुमार वावरे हे सध्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. येथील अर्थशास्त्र विभागामध्ये विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे नुकत्याच स्थापन झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा. येथे मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता ( Dean of Humanities) म्हणून ते कार्यरत आहेत. डॉ. वावरे हे छत्रपती शिवाजी कॉलेज, साताराचे उपप्राचार्य असेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक म्हणूनही काम पाहत आहेत. त्यांनी आजवर शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूर, अर्थशास्त्र अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे अध्यक्षपद देखील भूषविले आहे. आजही ते शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठामार्फत दिला जाणारा मानाचा असा बॅरिस्टर पी. जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराचे देखील ते मानकरी ठरले आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. यांच्या वतीने त्यांना आजवर तीन वेळा “बेस्ट परफॉर्मर ऑफ द इयर” हा पुरस्कार देण्यात आला आहे. प्राचार्य डॉ. एस आर. सूर्यवंशी यांच्या नावाने दिला जाणारा “बेस्ट रिसर्चर ऑफ द इयर” हा पुरस्कार देखील त्यांनी दोन वेळा मिळवलेला आहे. मागील वर्षी ‘अर्थसंवाद’ या “मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या” अतिशय प्रख्यात अशा त्रैमासिकातील सर्वोत्कृष्ट “वार्षिक रिसर्च आर्टिकल” चे पारितोषिक देखील त्यांना प्राप्त झाले आहे. आज अर्थशास्त्र विषयातील एक सिद्धहस्त लेखक, प्रबोधनशील वक्ते, संशोधक, संशोधक मार्गदर्शक, विद्यार्थी प्रिय शिक्षक व उत्तम प्रशासक अशा विविध भूमिकांमधून त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य सुरू आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन रयत शिक्षण संस्थेने त्यांना यावर्षीचा “यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!