देश विदेश

कोंकणी ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’चा उद्या IFFI मध्ये प्रीमिअर

_प्रसिद्ध अभिनेते विजय सेतुपथीच्या हस्ते झाले पोस्टरचे अनावरण

 

पणजी (प्रतिनिधी) :
भारताच्या ५४ व्या आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवाची रंगत आता वाढत असून, जगभरातील विविध सिनेमांचा आस्वाद प्रेक्षक घेत आहेत. या महोत्सवातील गोवन स्टोरीज विभागात निवडलेल्या गेलेल्या सात सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती. त्यातील ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’ या लघुपटांचे प्रदर्शन २५ नोव्हेबर रोजी सकाळी ९.०० वाजता आयनॉक्स ऑडी ३ मध्ये होत आहे. प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपथी यांनी नुकतेच या लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण करत लघुपटाला शुभेच्छा दिल्या.

सहित स्टुडिओची निर्मिती असलेल्या ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’ हा कोंकणी लघुपट एक वेगळाच प्रयोग म्हणता येणार आहे. गेल्या दोन सलग वर्षात सहित स्टुडिओच्या ‘कुपांचो दर्यो’ आणि ‘अर्दो दीस’ या दोन लघुपटांनंतर आता ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’ची निवड सलग तिसऱ्या वर्षी iffiच्या गोवन स्टोरीज विभागात होत आहे. हा लघुपट म्हणजे गेल्या दोन सिनेमांचा पुढील भाग म्हणजेच लघुपट त्रयी म्हणता येईल. लघुपटांमध्ये अशाप्रकारे सिनेत्रयी साकारण्याची हि पहिलीच वेळ मानले जाते.  अगोदरच्या दोन भागांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता तिसऱ्या भागात जॉय आणि मानवी यांचे आयुष्य कोणत्या वळणावर येऊन ठेपले आहे, याचे कुतूहल प्रेक्षकांमध्ये नक्कीच आहे.

घरामुळे कुटुंब तयार होते कि, कुटुंबामुळे घर होते हा नेहमीच चर्चेचा विषय आहे. ‘घर’ या भावनेमध्ये स्त्रीची भूमिका नेहमीच मध्यवर्ती राहिली आहे. स्त्रीच्या भूमिकेचा उहापोह आम्ही ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे या आणि या अगोदरच्या दोन्ही लघुपटाचे  एक तांत्रिक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही हे तिन्ही लघुपट नैसर्गिक प्रकाश योजनेत साकारले आहेत. त्यामुळे हा असा प्रयोग गोवन सिनेमात बहुधा प्रथमच होत असेल. आमचे हे सगळे प्रयोग प्रेक्षकांना नक्की आवडतील, असा विश्वास दिग्दर्शक हिमांशू सिंग यांनी व्यक्त केला.

किशोर अर्जुन यांच्या सहित स्टुडिओची निर्मिती असलेल्या ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’चे दिग्दर्शन हिमांशू सिंह यांनी केले आहे. तर गोमंतकीय कलाकार उगम जांबवलीकर, दक्षा शिरोडकर, सोबिता कुडतरकर यांच्या या लघुपटात महत्वाच्या भूमिका असून अश्विन चिढेने छायाचित्रण केले आहे. कला विभाग पंकज कटवारेने सांभाळला आहे. ध्वनी संयोजन भावेश फुलारीने केले असून संगीत विजय झेव्हिअर यांचे आहे.


सलग तीन वर्षे सहित स्टुडिओचे कोंकणी लघुपट iffi च्या मंचावर निवडले जात आहेत, यानिमित्ताने कोंकणी सिनेसृष्टीत प्रथमच आम्हाला अस्स्सल ‘गोवन सिनेत्रयी’ घेऊन येण्याची संधी मिळते आहे. हि आमच्यासाठी आनंदाची आणि उत्साहाची बाब आहे. कोंकणी भाषेत अनेक उत्तमोत्तम कथा- कादंबऱ्या- नवलीका आहेत, ज्या आमच्या इथल्या मातीतल्या आहेत. त्यांना सिनेमाच्या पडद्यावर या निमित्ताने घेऊन येण्यासाठी आमचे विशेष  प्रयत्न असणार आहेत. ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’ हा आमचा असाच एक प्रयत्न आहे. कुपांचो दर्यो, अर्दो दीस या आमच्या अगोदरच्या दोन लघुपटांना प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’ला सुद्धा देतील यात आमच्या मनात शंका नाही.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!