प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून दीपाली पवार यांच्या जीवनाला “स्वाद”
नवदुर्गा लेखमाला भाग 4

मूळच्या कुंडल भूमीतील आणि पलूस या कर्मभूमीतील दीपाली बाबासाहेब पवार यांनी संघर्षाच्या वाटेवरून स्वतःचा वेगळा मार्ग शोधला. एक सामान्य गृहिणी म्हणून सुरुवात केलेल्या त्यांच्या प्रवासाला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून नवा “स्वाद” लाभला. आज त्या “स्वाद मसाले” या फर्मच्या माध्यमातून शेकडो महिलांना स्वावलंबनाचा मंत्र देत आहेत.
दीपाली पवार यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यानंतर सन 2005 साली त्यांचे लग्न झाले. लग्नापूर्वीच त्यांचे सासरे वारले होते. घरची परिस्थिती नाजूक असल्याने घरातील मोठी सून म्हणून नवी जबाबदारी त्यांच्या अंगावर येऊन पडली. सासरची परिस्थिती बेताची, वय लहान, शिक्षण कमी यामुळे दीपालीताई हताश झाल्या. लग्नानंतर घरच्या जबाबदाऱ्यांनी गुदमरलेल्या या तरुणीने आत्मविश्वास हरवला होता. मात्र परिस्थितीला शरण न जाता, नव्याने उभं राहण्याचा त्यांनी निर्धार केला.
याबाबत दीपाली पवार म्हणाल्या, माझ्या स्वतःच्या संघर्षाबरोबरच ग्रामीण भागातील आजूबाजूच्या महिलांची जगण्यासाठीची धडपड मी रोज पाहत होते. मजुरीला जाणाऱ्या महिलांचे प्रश्न बघून, त्यांच्यासाठी काहीतरी करावे, असे मला सतत वाटायचे. त्यातून आसपासच्या महिलांना एकत्र आणत 2014 साली कुंडल येथे ज्योतिर्लिंग महिला बचत गटाची स्थापना केली. बचत गटातील महिला शेळीपालन, पिठाची गिरणी, उन्हाळी पदार्थ बनवणे असे वेगवेगळे पदार्थ करत, असे त्यांनी सांगितले.
बचत गटाच्या माध्यमातून उत्पादन सुरू झाले, मात्र प्रश्न होता तो उत्पादन सुरू केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होण्याचा. दोन वर्षे हा अनुभव घेतल्यानंतर बाजारपेठेचा अंदाज घेऊन दीपालीताईंनी तालुक्याच्या ठिकाणी पलूस येथे स्थलांतरीत होण्याचा निर्णय घेत स्वतंत्ररीत्या मसाले व चटणी तयार करणाऱ्या स्वाद मसाले या फर्मची स्थापना केली. इथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
याबाबत दीपाली पवार म्हणाल्या, पलूस येथे स्थलांतरीत झाल्यानंतर 2016 साली आम्ही स्वाद मसाले या फर्मची स्थापनी केली. भाडेतत्त्वावर जागा घेऊन स्वतःचे युनिट सुरू केले. यामध्ये आज 30 महिला काम करतात. दर्जा व गुणवत्तेमुळे मालाची मागणी वाढली आहे. याबरोबरच आम्ही पलूस तालुक्यातील 30 महिला बचत गटांनी तयार केलेले उन्हाळी वाळवणाचे पदार्थ व दिवाळीचा फराळ आमच्या ब्रँडखाली विक्री करत असल्याचे त्यांनी सांगितले.
जवळपास सात ते आठ वर्षे हे काम केल्यानंतर कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दीपाली पवार यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती मिळाली.
याबाबत दीपाली पवार म्हणाल्या, कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून आम्ही एचडीएफसी बँकेत 38 लाख रूपयांचा कर्जप्रस्ताव सादर केला. तो मंजूर झाल्यानंतर आम्हाला अधिक व्यावसायिक पद्धतीने काम करण्याची संधी मिळाली. या कर्जातून आम्ही पॅकिंगच्या अत्याधुनिक मशिन्स खरेदी केल्या. या सुविधेमुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि ब्रँडिंग वाढले. बाजारपेठ विस्तारली आणि महानगरांपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मसाल्यांना मागणी मिळू लागली. या योजनेतून मिळालेल्या 10 लाखांच्या अनुदानामुळे व्यवसायाला भक्कम पाया मिळाला. सातत्याने प्रयत्न करून आम्ही ग्राहकांचा विश्वास संपादन केला. मार्केटिंगसाठी मला पतींची भक्कम साथ लाभली आहे. शिवाय सासूबाईंसह कुटुंबातील 9 सदस्यांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
स्वाद मसालेच्या माध्यमातून दीपालीताईंनी पलूस तालुक्यातील 30 बचतगटातील जवळपास 300 महिलांना आर्थिक आधार दिला आहे. या महिलांनी तयार केलेले उन्हाळी वाळवणाचे पदार्थ व दिवाळीचा फराळ त्या स्वाद मसालेच्या माध्यमातून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाजारपेठेत पोहोचवत आहे. स्वाद मसाल्याने दोन वर्षांपूर्वी दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन आपली उत्पादने निर्यात करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.
एकूणच परिसरातील महिलांना स्वावलंबी बनवणे व स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा करण्याचे काम दीपालीताई करत आहेत. संघर्षातून उभ्या राहिलेल्या दीपालीताई आज अनेक पुरस्कारांनी गौरविल्या गेल्या असून, एक सामान्य गृहिणी ते यशस्वी उद्योजक या प्रवासामुळे ग्रामीण भागातील महिलांसाठी त्या प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत.
प्रेरणा – मा. ना. चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, सांगली जिल्हा
प्रोत्साहन – श्री. अशोक काकडे, जिल्हाधिकारी, सांगली
लेखन संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली
समन्वय वर्षा पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सांगली
संकलन राऊ देशमुख, समुपदेशक