

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुणे) -:
येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयाप्रती आगळीवेगळी कृतज्ञता व्यक्त केली आहे. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयाला तब्बल १४ लाख रुपये किमतीची स्कूल व्हॅन’भेट देण्यात आली. या गाडीचा शानदार लोकार्पण सोहळा धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा नवोदय विद्यालयाचे चेअरमन मा. कीर्ती किरण पुजार यांच्या शुभहस्ते काल विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.
या छोटेखानी परंतु अत्यंत गरिमापूर्ण कार्यक्रमाला तुळजापुर तहसीलदार मा.अरविंद बोळंगे, नवोदय विद्यालयाचे प्राचार्य संजय माने, निवृत्त प्राचार्य दत्तात्रय बडे, माजी विद्यार्थी संस्थेचे प्रतिनिधी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२०० माजी विद्यार्थ्यांचे १४ लाखांचे योगदान
आपल्या मातृसंस्थेप्रती (विद्यालयाप्रती) असलेली आस्था आणि ऋण फेडण्यासाठी नवोदयच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा स्तुत्य उपक्रम राबवला. जवळपास २०० माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने ₹१००० ते ५०,००० आर्थिक योगदान देत अवघ्या काही दिवसांत तब्बल १४ लाख रुपये जमा केले इंजि.गोपिनाथ खरटमोल यांनी फोर्स कंपनीशी समन्वय साधला आणि ही स्कूल व्हॅन निश्चित केली व विद्यालयाला सुपूर्द केली.
नवोदयचे विद्यार्थी म्हणजे देशाचे भविष्य: जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार
गाडीचे लोकार्पण केल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार म्हणाले,
> “नवोदयचे विद्यार्थी हेच देशाच्या भविष्यातील विविध क्षेत्रांचे नेतृत्व करण्यासाठी तयार केली जात असलेली एक प्रशिक्षित टीम आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात या विद्यार्थ्यांचे योगदान मोठे आहे.”
पुढे बोलताना त्यांनी आजी विद्यार्थ्यांना आपण नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरलात ही मोठी कामगीरी असूनएवढ्यावर न थांबतां आपल्या अभ्यास आणि कौशल्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून उज्ज्वल कामगिरी करण्याचे व देशाच्या विकासात आपले योगदान देण्याचे आवाहन केले.
माजी विद्यार्थी नेहमीच मदतीसाठी तत्पर
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अॅड. अमोल गुंड यांनी माजी विद्यार्थी संस्थेद्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तर या प्रसंगी बोलताना प्रा. तुषार वाघमारे यांनी विश्वास दिला की, नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी हे सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहतील. विद्यार्थ्यांना व विद्यालयाला जिथे कुठे आणि जेव्हा आवश्यकता पडेल, तिथे माजी विद्यार्थी मदतीसाठी तत्पर असतील.
विद्यालयाचे प्राचार्य श्री. संजय माने यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या अनोख्या आणि कौतुकास्पद उपक्रमाबद्दल संपूर्ण विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले. माजी विद्यार्थी मेळाव्यात दिलेला शब्द अतिशय कमी वेळेत पुर्ण केला याचा अभिमान वाटतो अशी भावना सेवानिवृत्त प्राचार्य दत्तात्रय बडे यांनी व्यक्त केली.
या सोहळ्याला नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांपैकी श्री. मंगेश जवादे, श्री. सुदर्शन गुंड, डॉ. मनोज देव्हारे, डॉ. श्याम चौधरी, डॉ. दयानंद चौरे, श्री विकास यादव, श्री. भगवान मोटे, अलका अडसुळ श्री. राहुल जाधव, श्री. अविनाश जगदळे यांच्यासह अनेक क्षेत्रांतील नामवंत माजी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.