इफ्फी 2024 : “स्वातंत्र्यवीर सावरकर”ने उघडणार पडदा
पणजी येथे आकर्षक पोस्टर्स आणि मंडप उभारण्याचे काम जोरात सुरू

पणजी: इफ्फी 2024 : “स्वातंत्र्यवीर सावरकर”ने पडदा उघडणार आहे. इफ्फी मुळे पणजी येथेही आकर्षक पोस्टर्स आणि मंडप उभारण्याचे काम जोरात सुरू आहे.
५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने आधीच महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. तर यावर्षी विक्रमी संख्येने प्रतिनिधींची नोंदणी होण्याची शक्यता आहे. नक्कीच यावर्षी रसिक प्रेक्षक विविध अंगाने अनुभव घेतील.
२० ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या महोत्सवाची तयारी सध्या सुरू आहे. गोवा मनोरंजन संस्थेच्या परिसरात आकर्षक पोस्टर्स आणि मंडप उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा प्रतिनिधी नोंदणीत मोठी वाढ झाली आहे.
या ३,६५९ प्रतिनिधींमध्ये देश-विदेशातील चित्रपट अभ्यासक, चित्रपटप्रेमी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. गोवा मनोरंजन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, यंदाचा इफ्फी प्रचंड यशस्वी ठरणार आहे. याव्यतिरिक्त माध्यम प्रतिनिधींनीही या महोत्सवाच्या वृत्तांकनासाठी मोठ्या संख्येने नोंदणी केली आहे. यात डिजिटल मीडियाचे ३०, मीडिया कॅमेरापर्सन ३३ तर मीडिया प्रतिनिधी म्हणून १९० जणांनी नोंदणी केली आहे.
‘मास्टर क्लास’मध्ये अनुपम खेर
प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांचा ”पॉवर ऑफ फेल्यूर” विषयावर कला अकादमीत २३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४.३० ते ६ वाजेपर्यंत मास्टर क्लास होणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षी एक खास पाहुणा म्हणून अनुपम खेर यांची उपस्थिती लाभणार आहे. यामुळे यावर्षी रसिक प्रेक्षकांना इफ्फी चा चांगला अनुभव घेता येणार आहे.