महाराष्ट्र

लोकसभा निवडणूक कामकाजासाठी नियुक्त पथकांनी समन्वयाने काम करावे :  खर्च निरीक्षक संजीव कुमार

            सांगली : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४  निर्भय आणि  भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कामकाजासाठी नियुक्त सर्व पथकांनी समन्वयाने काम करावे. लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारास 95 लाख खर्चाची मर्यादा आयोगाने घातली असून उमेदवारांकडून प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक खर्चावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचना 44-सांगली लोकसभा मतदार संघाचे खर्च निरीक्षक (Expenditure observer) संजीव कुमार यांनी दिल्या.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात खर्च निरीक्षक संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता  शिंदे, खर्च निरीक्षक – नोडल अधिकारी शिरीष धनवे आदी उपस्थित होते.

            खर्च निरीक्षक संजीव कुमार म्हणाले, निवडणुकीत अवैध मार्गाने होणाऱ्या खर्चावर बारकाईने लक्ष देऊन याची तपासणी होणे गरजेचे आहे. यामध्ये  एसएसटी व एफएसएसटी पथकांची मोठी जबाबदारी आहे. या पथकांनी अवैध दारू व  अवैध रकमेची तपासणी करावी. जिल्ह्यात येणाऱ्या संशयित वाहनाची बारकाईने तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

            जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, एसएसटी व एफएसएसटी पथकांनी संशयित वाहनांची कडक तपासणी करावी. हिशोबापेक्षा अधिक रक्कम आढळून आल्यास नियमानुसार संबंधितावर  कारवाई करावी. तपासणी पथकांना देण्यात आलेल्या वाहनावर जीपीएस सिस्टीम कार्यरत करण्यात आली असल्याने या पथकानी  सचोटीने काम करावे.

            पोलीस अधीक्षक श्री. घुगे यांनी सांगितले, निवडणूक कालावधीत अवैध दारू, अवैध रक्कम पकडण्यात एसएसटी व एफएसएसटी पथकांचे काम महत्वाचे आहे. अंतर राज्य सीमेवरील चेक पोस्टवरील व आंतर जिल्हा सीमेवरील चेक पोस्टवर संशयित वाहनांची कसून तपासणी करण्यात यावी. यावेळी निवडणूक कामकाजासाठी नियुक्त पथकातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

०००००००

खर्च निरीक्षक संजीव कुमार यांची प्रसार माध्यम कक्षास भेट

 

        सांगली: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या प्रसार माध्यम कामकाजासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षास आज ४४-सांगली लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त खर्च निरीक्षक संजीव कुमार यांनी भेट देऊन पाहणी करून कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

            तत्पूर्वी  खर्च निरीक्षक संजीव कुमार यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी उमेदवार व राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या देण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या एक खिडकी कक्ष, नियंत्रण कक्ष आणि मतदार मदत केंद्रास भेट देऊन येथील कामकाजाची माहिती घेवून आवश्यक सूचना दिल्या.

            यावेळी खर्च निरीक्षक संजीव कुमार यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, खर्च निरीक्षक -नोडल अधिकारी शिरीष धनवे उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!