महाराष्ट्र

भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय, भिलवडी यांची ५२ वा वाचनकट्टा उपक्रम उत्साहात

 

भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय, भिलवडी 1 एप्रिल 2024 रोजी आयोजित ५२ वा वाचनकट्टा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी उपस्थित वाचक सदस्यांनी गत महिन्यात आपण केलेलं वाचन, काव्य, लेखन तसेच ‘वाचनकट्टा, या उपक्रमामुळे कोणता बदल? लाभ झाला? याबाबत मनोगते व्यक्त केली.
यावेळी  मळणगावचे दत्ताजीराव संपतराव शिंदे यांनी लिहीलेल्या ‘आप्पा, या पुस्तकाच्या प्रती वाचनालयास तसेच मित्रवर्य व वाचनालयाचे अध्यक्ष, उद्योजक मा. गिरीश चितळे, माझे इयत्ता दहावीत असतानाचे वर्ग शिक्षक, साहित्यिक, वाचनालयाचे कार्यवाह श्री. सुभाष कवडे सर् यांना भेट दिल्या.

यावेळी बोलताना दत्ताजीराव शिंदे म्हणाले मी इथं सेकंडरी स्कूल मध्ये होतो. तेंव्हा शाळेला जाता येता गिरीश, मकरंद, धनंजय, संजय या मित्रांच्या समवेत असायचो. पाऊस काळात शाळेचा चिखलमय रस्ता तुडवत जायचो. बाजूला जागोजाग लाल गढूळ पाण्याची डबकी असायची. पाणी निवळलं की त्यातले पाणसाप, खेकडे, मोठे सोनबेडूक इ. जलचरांकडे कितीतरी वेळ पहात राहायचो. मोठ्या माणसांच्या तोंडून ऐकलेल्या आडवड्यातील भुताच्या कथा हमखास आम्हाला आठवू लागल्या की भिती वाटू लागायची. अन् अंधार पडायच्या आत घर आम्ही गाठायचो.

शाळेला सुट्टी असली की सवांगड्यासोबत मी घाटावर जायचो. ओवऱ्यावर बसून संथ वाहणारं नदीचं टक लावून पाहायचो. पावसाळ्यात कृष्णेला आलेला पूर मी पाहिला. उन्हाळ्यात पाणी आटल्यावर उघडीवाघडी झालेली कृष्णा मी पाहिली. त्यामुळं लेखन करत असताना इथल्या माणसांसोबतच, कृष्णाकाठ, आडओढा, इ. भिलवडी परिसरातील ठिकाणांची वर्णन लेखणीतून आपसूक पाझरत असतात.
मी लिहिलेल्या पाहिल्यावाहिल्या ‘आप्पा, या पुस्तकाचं आपण सर्वांनी वाचन करावं. अशी मी विनंती करतो.’

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सर्व वक्त्यांच्या भाषणांचा परामर्श घेत मा. गिरीश चितळे हेही बालपणीच्या आठवणीत रमले. यावेळी दै. लोकमतचे सांगली आवृत्तीचे संपादक श्री. हणमंत पाटील साहेब, व्यवस्थापक श्री. हसबनिस साहेब, वितरण व्यवस्थापक श्री. पाटील साहेब, ‘हास्ययात्रा,कार शरद जाधव, संजय पाटील इ. मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

—————————————————–

‘वाचनकट्टा, या उपक्रमात मला सहभागी करून घेतलंत याबद्दल सार्वजानिक वाचनालयाचे अध्यक्ष, कार्यवाह सर्व संचालक, सदस्य सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद …!’लेखन: दत्ताजीराव संपतराव शिंदे

मळणगांव ता. कवठे महांकाळ जि. सांगली (महाराष्ट्र)


 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!