

दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी ( शिराज शिकलगार) -:
स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विटा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर,आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर स्वच्छतेत विशेष कामकाज सुरु आहे. आरोग्य विभागाच्या माहिती, शिक्षण व संवाद (IEC) टीम कडून शहरात जनजागृती व कारवाई सुरु आहे.
आज विटा शहरातील पोल्ट्री व्यावसायिकांनी स्वच्छतेबाबत जागृत राहून आपल्या पोल्ट्री व पारिसराची दैनंदिन स्वच्छता काटेकोरपणे केली पाहिजे याबाबत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व उपद्रव प्रतिबंधकविषयक तरतुदी नुसार विटा शहरातील पोल्ट्री व्यवसायिकांना पोल्ट्री व्यवसायामुळे माशांचा प्रादुर्भाव, दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण होत असल्याप्रकरणी 21 पोल्ट्री धारकांना नोटीस बजावली आहे
सदर नोटीसीव्दारे कळविण्यात आले आहे की आपण विटा शहरात चालवत असलेल्या पोल्ट्री व्यवसायाच्या ठिकाणी कोंबडीची विष्ठा, टाकाऊ पदार्थ व इतर कचऱ्याची योग्य व शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात माशांचा प्रादुर्भाव, दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण होत असल्याच्या तक्रारी विटा नगरपरिषदेकडे प्राप्त झालेल्या आहेत. सदर बाबीमुळे परिसरातील नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी आपणास या नोटिसीद्वारे सूचित करण्यात येते की, ही नोटीस प्राप्त झाल्याच्या क्षणापासून २ दिवसाच्या आत खालील बाबींची तात्काळ व काटेकोर अंमलबजावणी करावी.
आवश्यक बाबी :
१. पोल्ट्री परिसराची संपूर्ण स्वच्छता करावी.
२. कोंबडीची विष्ठा व इतर टाकाऊ पदार्थांची दररोज शास्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी.
३. माशांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक औषध फवारणी व निर्जंतुकीकरण करावे.
४. दुर्गंधी निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
५. परिसरात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता राहणार नाही याची सातत्याने दक्षता घ्यावी.
नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ व इतर प्रचलित कायद्यांतील तरतुदींनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर कारवाईस व त्यामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिणामांस आपण स्वतः सर्वस्वी जबाबदार राहाल, याची आपण गंभीर नोंद घ्यावी. असे नोटीस पालिकेने बजावले आहे.
शहर स्वच्छतेसाठी व नागरिकांच्या आरोग्य हितासाठी प्राप्त होत असलेल्या तक्रारी आणि परिसर स्वच्छता इत्यादी बाबींचा विचार करून पालिकेने नोटीस जारी केली आहे असे यावेळी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी नमूद केले.
नागरिकांनी स्वच्छतेच्या मोहिमेत योगदान द्यावे असे आवाहन पालिकेने केले आहे.
